Saturday, 9 July 2011

"कुणा एकट्याचीच ट्रेकिंगकथा"

स्थळ :- कॅफे paradise
तारीख, वार :- २ जुलै २०११, शनिवार
वेळ :- संध्याकाळी ६:३०
पात्रसंख्या :- ३
पात्रनावे :- अतुल तळाशीकर, नचिकेत कुलकर्णी, सारंग भोईरकर.

"मग उद्या जायचं ना कोरीगडला?"--सारंग
"अरे,उद्या घरी थांबायचं आहे.घरच्यांबरोबर बाहेर जावे लागेल"--अतुल
थोडा नाराज झालो मी,पण अतुलच म्हणण पटण्यासारख होत कारण गेल्याच विकेंडला राजगड केला होता आम्ही.
मग तोच प्रश्न मी नच्याला विचारला,म्हटलं हा नक्की येईल कारण तो राजगडला नव्हता. पण त्याने जे कारण दिल ते "आवरा" वर टाकण्याच्या लायकीच होत.
"माझ्या मावसबहिणीला नोकरी लागली आहे. सो, ती उद्या मला खायला घालणार आहे"--वदले कुलकर्णी
आणि तो "खायला घालणार आहे" असच म्हणाला बर का.!! नाहीतर तुम्हाला वाटेल मी अतिशयोक्ती करतोय.पार्टी देतीये, ट्रीट देतीये वगैरे काही नाही. "खायला घालणार आहे" संपला विषय. पण दोष त्याचा नाहीये .एकतर तो नारायण पेठेत राहतो.आणि दुसर अस कि तो नु.म.वि त शिकलाय.असो.
सलग दोन नकार (ट्रेकिंगचे) पचवून बाहेर पडलो. जिमला गेलो. तिथून संदीपला फोन केला. म्हटलं बघुयात हा तरी येऊ शकेन का? पण तो पुरंधरला जाणार होता.त्याच्या नकारानंतर मात्र उद्याच्या ट्रेकच्या कल्पनेची पूर्णपणे नसबंदी झाल्यासारख वाटल. पण तरीही कोरीगड मनातून जातच नव्हता आणि आता कुणालाही विचारण्यात रस उरला नव्हता.
जिम वरून घरी जातानाही गाडीवर तोच विचार आणि मग कस कुणास ठाऊक पण अचानक विचार आला मनात. कि एकट जायचं. नेहमी जातोच कि मित्रांबरोबर. उद्या एकटच जाऊयात.आणि तसही कोरीगड म्हणजे काय हरिश्चंद्र नाहीये कि कुणीतरी पाहिजेच बरोबर. सकाळी जाऊन संध्याकाळी परत.
त्या मनस्थितीतच घरी आलो. घरी फार काही बोललो नाही. लोणावळ्याला चाललोय एवढंच सांगितलं. नशीब "चौकशी समिती" बसली नाही. पण तरीही मासाहेबांनी कटकट केलीच. पण त्याचीही गरज आहेच कारण तिची चिडचिड झाल्याशिवाय माझा एकही ट्रेक पूर्ण होत नाही. (किंवा ती होऊ देत नाही.) एकूण एकच.
रविवारी सकाळी उठायलाच ७.३० वाजले. म्हटलं आता बोंबलतय जाण आपल. उशीर झाला. घाईघाईत आवरलं. आणि आहे तशीच sack घेऊन बाहेर पडलो. गाडीत पेट्रोल टाकल आणि वाकड च्या इथून NH-4 वर आलो. थोडा पाऊस भुरभुरत होता. फार गर्दी नव्हती. लोणावळा वगैरे भागाकड "विकेंड एन्जॉय" करायला जाणार पब्लिक दिसत होत. काही दुचाकीवर पण बरचस चारचाकीत. चारचाकीतल पब्लिक कस भुर्रकन निघून जात. पण दुचाकीवरच पब्लिक फार त्रास देत. म्हणजे गाडीवर एक मुलगा किंवा दोन मुलं असली तर आपल्याला कधीच त्रास होत नाही. पण जर एकाच गाडीवर भिन्नलिंगी माणस जर असतील, म्हणजे आपल्या वयाची तर मात्र लयी त्रास होतो. आणि असा त्रास परवा लयी झाला.एकतर "सुहाना सफर और ये मोसम हंसी" असा प्रकार, त्यात "मी यकटाच" आणि "ते दोघे". तिच्या मागे अजून एक माणूस बसवायचाय अशा समजुतीने ती बसलेली. दोघांच्या मधून केवळ मुंगी जाऊ शकेल एवढीच जागा. नाही, बसा हो. बसायला आमची काय हरकत असणारे? गाडी तुमची, पोरगी तुमची, खर्च तुमचा. फक्त आमचा प्रॉब्लेम असा आहे कि देवाने आम्हाला डोळे दिलेत आणि त्यांना असलं "भलत-सलतं" बघायची लयी सवय. आता हे "भलत" आहे कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण त्या तसल्या वातावरणात ते "सलतं" मात्र नक्की. असो.
पण जस तळेगाव सोडलं तशी रहदारी जरा विरळ होत गेली आणि मळवली आल्यावर डाव्या हाताला तुंग-तिकोना दिसले. एकदम फ्रेश वाटल. एक-दोन फोटो काढले. परत पुढे जायला लागलो. लोणावळ्यातून भुशी धरणाकडे वळलो. अजून १६ कि.मी. अंतर कापायच होत. १-२ कि.मी पुढे आलो, एक डोंगर ओलांडावा लागतो. छोटासा घाट आहे. त्यात शिरलो आणि ढगात चालणं काय असत याचा स्पष्ट अनुभव आला. मागे २० फुट आणि पुढे २० फुट एवढंच दिसत होत. बाकी संपूर्ण धुक. त्यामुळे सकाळी ९.३० वाजता गाडीचा दिवा लावावा लागला. तो घाट संपल्यावर एक फाटा लागतो. डावीकडचा रस्ता सहारा सिटीत जातो आणि उजवीकडच्या रस्त्याहून ४ कि.मी वर पेठ शहापूर. तिथेच एक केळेवाला उभा होता. त्याच्याकडून दोन केळी घेऊन खाल्ली. शहापूरला पोचेस्तोवर १०.१५ जाहले होते.

कोरीगडाचा आकार हा बराचसा कोयरी सारखा आहे. त्याचाच अपभ्रंश होवून हा कोरीगड झाला असावा आणि या कोयरीचा जो निमुळता भाग आहे त्याच्या पायथ्याला पेठ शहापूर आहे. चालायला सुरुवात केली आणि पहिल्यांदाच प्रत्यय आला तो उजव्या तटबंदीचा. जेव्हा आपण एखादा गड चढायला लागतो तेव्हा तटबंदी बर्याच वेळा उजव्या हाताला राहते. हे शिवदुर्गांच एक वैशिष्ट्य आहे. यामुळे होत असं,जर हल्ला झाला तर तटबंदीवरच्या पहारेकऱ्यांना एकेक माणूस नीट टिपता येतो. कोरीगड हा चढाईच्या दृष्टीने फारच किरकोळ आहे. आधी एक १० मिनिटांच जंगल आणि त्यानंतर ७०० पायर्या. थोड रमतगमत ५० मिनिटांत वर पोहोचलो.


महादरवाजाची बांधणी हि काहीशी गोमुखी थाटाची (शिवदुर्गांच आणखी एक वैशिष्ट्य). दरवाजाच्या बिजागर्यांचे होल्डर्स अजूनही दरवाज्याच्या आकाराची कल्पना देणारे आणि त्याच खालोखाल जमिनीपासून ५ फुटांवर अडसराची भोकं. या दोन गोष्टी आपल्याला अजूनही कुठल्याही गडावर बघायला मिळतील.


१६५७ मध्य हा गड महाराजांनी घेतल्याचे उल्लेख आहेत आणि आज जवळ जवळ ३५४ वर्षांनी सुद्धा त्या तशाच आहेत आणखी १००० वर्षे जगायला. दरवाज्याच्या समोरच असलेला या दरवाज्याचा संरक्षक बुरुज त्याच्यापासुनही ३० फुट उंचीवर आहे.


दरवाज्याच्या दर्शनी भागावर झेंडाकाठीपासून खाली ३ ते ४ फुटांवर, दोन्ही बाजूला एक नक्षी आहे, फुलांची हि नक्षी तुम्हाला जवळजवळ प्रत्येक गडाच्या महादारावाज्यावर दिसेल, बहुधा हिरोजी इटलकरांची ती favorite असावी.


आत गेल्यागेल्या लगेच एक सुंदर तलाव आहे.व्यवस्थित बांधून काढलेला. ज्याची भिंत हि थेट तटबंदीला जाऊन भिडते. आणि हो, महादरवाज्याचा थोड खाली १००-१५० पायर्या राहिलेल्या असतानाच पिण्याच्या पाण्याची सोय आहे. अतिशय निर्मळ पाणी. तलावाच्या काठीच महादेवच मंदिर आहे. छोटं आणि साधं. आत गेलो. अभिषेकपात्र रिकाम होत. तळ्यातून पाणी आणून ते भरलं. आरती करून बाहेर आलो. तटबंदीवर जाऊन उभा राहिलो आणि या गडाच आणखी एक वैशिष्ट्य नजरेत भरलं. ते म्हणजे उत्तर-दक्षिण पसरलेल्या या गडाची तटबंदी अजूनहि पूर्णपणे तशीच आहे.म्हणजे कोयरीच्या निमुळत्या बाजूपासून ते दुसर्या बाजूपर्यंत. आतल्या बाजूने मोजली तर काही ठिकाणी ती ५ ते ६ फुट आहे तर बाहेरील बाजूने डोंगराच्या मुख्य कातळापासून तिची उंची १८ ते २० फुट आहे.



महादरवाज्याचा एक बुरुज सोडला तर आणखी दोन बुरुज दिसतात..एक दक्षिणेला आणि एक उत्तरेला ( शहापूर जवळचा ). तटबंदीवर दर १०० फुटांवर बंदुकीच्या जागा आहेत..या जागांमध्ये काही ठिकाणी तटबंदीतच एक आडोसा तयार करण्यात आला आहे. आणि त्या अडोश्याच्या आत एक माणूस बसू शकेल एवढी जागा आणि एक outlet आहे. बहुधा याचा उपयोग तटबंदीवरच्या पहारेकर्यांकडून शौचकुपासारखा होत असावा. या अशा दोन-तीन जागा आहेत. "संडास" या गोष्टीचाही हिरोजींनी किती बारीक विचार केला होता आणि आज स्वातंत्र्या नंतर ६० वर्षे ओलांडली तरी आम्ही "हागणदारी मुक्त " गावाच्या योजना राबवीत असतो.


उत्तरेचा बुरुज हा आकाराने छोटा आणि त्याच्या खाली लगेच ताशीव कडा. या बुरुजाच्या मागेच १००-१५० मीटरवर डाव्या तटबंदीपासून आत एक खंदक आहे, ज्याच्या आत पाण्याची टाकी आणि छोट्या गुहा आहेत. तसं पाहायला गेल तर गडाच दक्षिणोत्तर अंतर हे २.५-३ कि.मी च्या आसपास, जे इतर गडांच्या तुलनेत फारच लहान. पण तरीही या एवढ्याश्या गडावर पाण्याची फारच मुबलक सोय आहे. पाण्याच महत्व राजांनी किती ओळखल होत हे यावरूनच दिसत. बुरुजावर गेलो तिथे आधीच काही मंडळी होती. त्या सगळ्यांना एकत्र करून एक मस्त घोषणा दिली आणि दक्षिणेच्या बुरुजाकडे निघालो.



जाताना तलाव ओलांडावा लागतो. त्याच्या पलीकडे महादेवच मंदिर आणि त्याच्याच शेजारी थोड वरच्या बाजूला गणपती आणि विष्णूच मंदिर. मी आत जाणार तेवढ्यात बाजूला काहीतरी चमकल. एक रामाचा फोटो होता. व्यवस्थित फ्रेम केलेला. राम, सीता, लक्ष्मण आणि मारुती चौघ आपले निवांत बसले होते. बाजूला दगड आणि धोंडे.


मला त्या फोटोच तिथल प्रयोजनच कळेना. पण म्हटलं जाऊ दे असेल काहीतरी. बूट काढून आत जाणार पण राम काही जाऊ देईना. सरळ खाली गेलो. फोटो उचलला आणि आत घेऊन आलो.आत आधी एक शिवलिंग आहे. त्याच्या मागे विष्णू, गणपती यांच्या दगडी मुर्त्या आणि त्यांच्या शेजारी साईबाबांचा एक फोटो. त्याच्याच शेजारी थोड adjust करून रामभाऊंना बसवलं. अयोध्येत नाही तर नाही निदान इथे तरी रामाला मंदिर देऊ शकलो याच समाधान. गणपतीची आरती केली. अभिषेकपात्र भरलं पाण्याने आणि बाहेर पडलो.


दक्षिणेकडच्या बुरुजाचा विस्तार हा बराच मोठा आहे. या बुरुजाकडे जाताना वाटेत दोन भग्नावशेष दिसले. आकारावरून तरी दारू कोठार आणि किल्लेदाराच्या वाड्याचे वाटतात. या बुरूजाजवळच कोराई माता मंदिर आहे. अगदी प्रशस्त. सभामंडप असलेल. कोराईदेवीची मुर्तीही उभट आणि प्रसन्नवदन असलेली. दर्शन घेऊन आरती केली. मंदिराच्या बाहेरच चौथार्यावर एक सुंदर दीपमाळ आहे.



मंदिराच्या मागे डावीकडे तटबंदीवर एक ९-१० फुट लांब तोफ आहे. पूर्वेकडून तोंड करून राहिलेली. मी तिथे गेलो तेव्हा एक मुलगा त्या तोफेवर आपल्या बापाची जहागीर आहे अशा पद्धतीने झोपून फोटो काढून घेत होता. पराक्रमाच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात हेच खर.असो.


कोराई मंदिराच्या मागे उजवीकडे तटबंदीत काही पायर्या आहेट ज्या थेट दक्षिणेच्या दरवाजात गेलेल्या. हा दरवाजा आंबवणे गावाकडे उघडतो. या दरवाज्याच्या गडाकडील भागात दर्शनी माथ्यावर एक चिन्ह कोरलंय. हे असच चिन्ह बाकीच्या गडांवरहि दिसत.


या दरवाजातून बघितलं तर दक्षिणेच्या बुरुजाचे आणि तटबंदीचे तीन थर एकाखालोखाल दिसतात. हि बांधणी केलीच कशी असेल याच गोष्टीच नवल वाटत. गडाच्या सीमा किती सुरक्षित असाव्यात याच हे एक उत्तम उदाहरण आहे.


या दरवाजाचा संरक्षक बुरुज म्हणजेच तो दक्षिणेचा बुरुज. दरवाज्यातून त्या बुरुजावर जायला एकतर कोराई मंदिराला वळसा घालून जाव लागत किंवा मग एक छोटा rock patch पार करून तटबंदीच्या बाजूने जाव लागत. बुरुजापासून मागे १००-२०० मीटर अंतरावर आणखी एक तोफ आहे. तिचीही लांबी ९-१० फुट असेल. तीच नाव लक्ष्मी तोफ.


या दक्षिणेकडच्या बुरुजाला वर जायला पायर्या आहेत. त्या पायर्यांच्या थोडंच मागे आणखी एक तोफ जमिनीवर पडलेली दिसली. लांबी बाकीच्या दोन तोफांची आहे तितकीच.



या बुरुजावरूनच खाली सहारा सिटी दिसते. उद्योगपतींचे आणि सत्ताधार्यांचे हात निसर्गाभोवती किती घट्ट आवळले आहेत याची कल्पना येते. या बुरुजाच्या मागे जी लक्ष्मी तोफ आहे तिच्या जवळ एक चौकोनी खोलगट बांधकाम आहे. कदाचित तो घोड्यांचा पाणवठा असावा.


कोराईमाता मंदिर आणि बुरुज यांच्यामध्ये एक निसर्गनिर्मित खंदक तयार झाला आहे. तो थेट दरवाजात जाऊन पोहोचतो. त्याच्यामुळे दरवाज्याच्या मागे एक छोटासा पण सुंदर आणि सुबक धबधबा तयार झाला आहे. निसर्गाने सह्याद्रीला सुंदरतेच लेण नेसवताना कुठेही हात आखडता घेतला नाहीये याच प्रत्यंतर पावलोपावली येत राहत.


आता जवळजवळ सगळा गड फिरून झाला होता. तसाच चालत महादरावाज्यात आलो. सहज म्हणून घड्याळ बघितलं तर ३.३० वाजले होते. तिथेच बाजूला एक ग्रुप काहीतरी खात बसला होता. ते पाहिल्यावर लक्षात आल कि अरेच्च्या आपण काहीच खाल्लेलं नाहीये, म्हणजे आपल्याकडे खायला काहीच नाहीये आणि हा पहिला ट्रेक असेल जिथे मी पाण्याची बाटलीही विसरलो होतो. पण गड पाहताना आणि त्याचा अभ्यास करता याची कशाचीच आठवण राहिली नव्हती. एकदा तटबंदीवर चढून परत गड दिसेल तितका पाहून घेतला. महादरवाज्यातून बाहेर पडून गडाला आणि महाद्वाराला मुजरा केला आणि उतरायला लागलो. २० मिनिटात खाली आलो. येताना वाटेत एक "धनाजी जाधव" नामक ठाण्याला राहणाऱ्या मित्राची ओळख झाली. त्याच्या ऐतिहासिक नावामुळे तो चांगलाच लक्षात राहिला.गाडीपाशी आलो. "धनाजीरावांचा आणि कोरीगडाचा" निरोप घेतला आणि पुण्याच्या वाटेला लागलो....

पोटात भूक होती पण एक छोटीशी गोष्ट केल्यामुळे जो आनंद आणि आत्मविश्वास मिळाला होता त्यापुढे तीच काहीच वाटत नव्हत. माणसांच्या जंगलात स्वतःच माणूसपण हरवून जगणाऱ्या आपल्यासारख्यांनी कधीतरी माणूस व्हायला खर्याखुर्या जंगलात जायला हव. स्वतःचेच काही नवीन पैलू शोधायला आणि मुख्य म्हणजे स्वतःची कंपनी एन्जॉय करायला. मी तरी केली ती !! तुम्ही कधी करताय? -:)


--
-- आपला,
|| श्रीशिवछत्रपती चरणी तत्पर, सारंग भोईरकर ||

Friday, 1 July 2011

हा देव आणि तो देव....................

"लवलवथी विक्राळा ब्रम्हांडी माळा विषे कंठकाळा त्रिनेत्री ज्वाळा..."
शंकराची आरती अशी मस्त रंगात आली आली होती, स्थळ होत राजगडाच्या बालेकिल्ल्यातल ब्रम्हऋषी मंदिर.
फार तर १० * १० च ते दगडी मंदिर.वरती पत्र्याच छत.एक लाकडी दार.एक लाकडी खिडकी.आत एक शिवलिंग आणि त्यावर एक अभिषेकपात्र.बास संपलं मंदिर...!!!
छताचे पत्रेही बहुतेक आत्ता बसवले असावेत, शिवकालीन वाटत नाहीत ते.
आणि या सर्वांच्या जोडीला होता सह्याद्रीचा तुफान पाऊस, सुसाट वारा आणि प्रचंड धुकं.
आरती झाली, मंत्रपुष्पांजलीहि झाली. चंद्रकोर तळ्यातून पाणी आणून अभिषेकपात्र भरलं
आणि प्रसन्न मनाने आम्ही बालेकिल्ला पाहायला गेलो.....
तेव्हा नाही वाटल काही पण पुण्यात घरी आल्यावर निवांत बसलो तेव्हा मात्र खूपच प्रकर्षाने आठवल ते मंदिर.
तसं पाहायला गेल तर राजगडाच्या पद्मावती माचीवरील पद्मावती देवीचं मंदिर हा तर हेमाडपंथी बांधकामाचा सर्वांगसुंदर नमुना आहे.



पण हे ब्रम्हऋषी मंदिर फारच डोक्यात बसलं..तिथली ती एकटीच असलेली महादेवाची पिंड, आणि तिच्या सोबतीला ते अभिषेकपात्र. आरती करताना अस वाटत होत कि खरच ऐकत असेल भगवान महादेव हि आरती. ९ मुलांनी कुठलाही महागडा धूप, कापूर, पंचारती आणि कसलाही किमती नैवेद्य न वापरता केलेली.
भक्तांची रांग नाही, दक्षिणापेटी नाही, संगमरवरी फरश्या, खांब नाहीत.देवामध्ये आणि भक्तांमध्ये तथाकथित बडव्यांनी उभी केलेली कुठलीहि संरक्षक भिंत नाही. कुणीही याव आणि दर्शन घ्याव. अगदी थेट पिंडीला हात लावून.तुमच्या पगारावर किंवा खिशातल्या लक्ष्मीवर तुम्ही दर्शन गाभार्यातून घ्यायचं, सभामंडपातून घ्यायचं कि आणखी कुठून घ्यायचं हे ठरवायला तिथे कुणीच नव्हत कारण तो देव कुणाच्याही नवसाला पावणारा नव्हता. म्हणून तिथे कुठलाही ट्रस्ट नव्हता, राजकारण किंवा सत्ताकारण नव्हत आणि सर्वात महत्वाच म्हणजे तिथे कसलही "अर्थकारण" नव्हत...!!

तसा तो महादेव अगदीच निरुपयोगी आहे; नाही का? कारण कुठलाही मंत्री, आमदार, खासदार किंवा एखादा सिनेनट, नटी किंवा एखादा क्रिकेटर, खेळाडू तिथे येणार नव्हता. घोटाळ्यात सापडलेला लोकप्रतिनिधी किवा प्रशासन अधिकारी तिथे येऊन त्या घोटाळ्यातून सोडवण्यासाठी देवाला किंवा त्याच्या या एजंटांना लाच देणार नव्हता. तिथ येऊन प्रसारमाध्यमांना एखादा बाईट देणार नव्हता..छे !! असा कुठे देव असतो का.?
देव म्हणजे किमान ३-४ किलोमीटरची रांग..पण ती सामान्य भक्तांची बर का ? मग त्यांच्याहून थोडे श्रीमंत वेगळ्या रांगेत.मग व्ही.आय.पी आणि मग व्ही.व्ही.आय.पी !!!
भारतीय समाज हा नेहमीच असा वाटला गेलाय..पूर्वी या रांगा जन्मावर ठरायच्या आता पैशावर ठरतात इतकाच काय तो बदल.
मग त्या देवाला ज्याने सर्वात जास्त लाच (माफ करा पण हाच शब्द सुचतोय मला ) दिली असेल त्याचं नाव किंवा वंशावळ तिथे कोरायची. आणि त्याच्या पुढच्या किमान २० पिढ्यांनी त्या लाचेवर सामान्यांना ताटकळत ठेवून आपल्याला हव तेव्हा दर्शन घ्यायचं हिच आजच्या देवस्थानाची व्याख्या आहे.
भारतातल्या एका सर्वात मोठ्या देवस्थानाचे पुढच्या ३० वर्षांचे अभिषेक आत्ताच बुक झालेत म्हणे. म्हणजे थोडक्यात या "भक्तांनी" देवाला स्वतःच्या आर्थिक ताकदीने जखडून टाकलंय. काय बिशाद आहे देवाची कि तो यांना भेटणार नाही त्या ठरलेल्या तारखेला. उगीच का लाखभर रुपये ओतलेत ???
आणि खर सांगू तर हल्ली देवालाच भित्र करून टाकलंय आम्ही. देवळाच्या भोवती बुलेट प्रुफ काचा बसवून आणि सशस्त्र रक्षकांचा पहारा बसवून.
फार लांब गेलाय ना देव आपल्यापासून? दगडूशेठचच उदाहरण घ्या ना. तो बाप्पा माझ्या लहानपणी म्हणजे एक दहा-बारा वर्षांपूर्वी खूप आपलासा वाटायचा.शाळेतून सुटल्यावर घरी जाताना वाटेवरच होता तो. गर्दी तेव्हाही असायची पण "पहारेकरी" नव्हते तेव्हा तिथे. सी.सी.टिव्ही कॅमेरे पण नव्हते..निर्धास्त होता तेव्हा दगडूशेठ !!!




काय दुर्दैव आहे ना ? देवादेवातही किती फरक पडलाय किंवा आपण पाडलाय ? धर्म तोच, देवही तोच...फक्त जागा चुकलीये......
म्हणूनच कदाचित दगडूशेठ "श्रीमंत" आहे. आणि स्वराज्याच सोनेरी स्वप्न पूर्ण करताना शुभाशीर्वाद लाभावेत म्हणून महाराजांनी वसवलेला तो महादेव, ती पद्मावती, तटा-बुरुजांवरचे आणि माच्यांवरचे मारुती, गणपती आज असलं तर छपराखाली नाहीतर तसेच उघडे-बोडके बसून आहेत.




म्हणूनच या श्रीमंत देवांकडे किंवा बाबांकडे जायला नको वाटत..त्यांच्या मंदिरांसामोरून जातानाहि पूर्वी सहज केला जाणारा नमस्कार हल्ली नाही करावासा वाटत.
पण जेव्हा अशा डोंगर-दर्यातले एखाद्या गळक्या कौलारू मंदिरातले देव भेटले कि मग मात्र हात नकळत जोडले जातात.,कारण त्यांना कधीतरी स्पर्श झालाय महाराजांचा, मासाहेबांचा,
संभाजीराजांचा आणि कितीतरी अज्ञात मावळ्यांचा....
मग तिथे कशाचीही गरज नसते,,,,ना तबक, ना कापूर, ना निरंजन...फक्त मनात उदंड श्रद्धा आणि प्रेम.आणि तसही देवाला तरी याहून जास्त काय हवं असत?
त्यामुळेच बहुधा मला तरी माझा देव इथेच दिसतो., इतरांच मला माहित नाही !!!!!




--
-- आपला,
|| श्रीशिवछत्रपती चरणी तत्पर, सारंग भोईरकर ||