Saturday, 4 June 2011

रायगडाला जेव्हा झोप येते..................

पूर्वेला झुंजूमुंजू झाल.तांबड फुटलं.आळोखेपिळोखे देत रायगड उठला.रिवाजाप्रमाणे दरबारात मुजर्याला गेला.तसाच तिथून निघून होळीच्या माळावरील
महाराजांच्या प्रतिमेलाहि त्रिवार मुजरा केला.त्याच रस्त्याने पुढे जाऊन जगदीश्वराच आणि समाधिच दर्शन घेतलं त्याने आणि परत फिरणार तोच नजर गेली वाघ्याच्या समाधीवर.सहज पाहिलं त्याने वाघ्याच्या डोळ्यात तर थोडी भीती दिसली त्याला.कदाचित त्याचे शेवटचे काही दिवस आपल्याबरोबरचे!! मग एकतर हलवला जाईल किंवा उखडला तरी.फक्त हे करताना श्रींच्या समाधीला बाधा न व्हावी हीच इच्छा. "पण आपल्या इच्छेला कोण विचारतो?" अस म्हणत स्वतःशीच हसला रायगड..खिन्नपणे...
जगदिश्वराला वळसा घालून बाराटाकीवरून सरळ खालच्या रस्त्याला लागला, भवानी मंदिराकडे जायला आणि देव दर्शन उरकून नेहमीप्रमाणे जाऊन बसला टकमकीवर..आरामात..खाली दरीत पाय सोडून..समोरच खाली पाचाड दिसत होत..नकळत हात जोडले गेले त्याचे..आणि मनात विचार आला.."अरे आता राज्याभिषेक जवळ आला नाही का? म्हणजे मासाहेबांच श्राध्द पण जवळ आल..गेलोच नाही किती दिवस झाले पाचाडला..जाऊन येऊ एक दोन दिवसात !!!"

बराच वेळ रायगड तसाच बसून राहिला आणि अचानक कानांवर संगीताचे सूर पडले. आवाज महादरवाज्याकडून येत होता, तसाच उठला आणि
महादरवाजात आला. तिथे काही नवयुवक आणि नवयुवती आपल्या आधुनिकतेची साक्ष पटवून देत नको इतके खेटून बसले होते..पण आता सवय जाहली
होती रायगडाला याची. वाईट फक्त एकाच गोष्टीच वाटत होत त्याला कि ज्या दरवाजातून एके काळी मोहिमांच्या नौबती ऐकत लाखो मावळे ये जा करायचे,
अनेक सरदार दरकदार दरबारी मुजर्याला जायचे. स्वतः महाराज आणि युवराजांचे घोडे, पालख्या मार्गक्रमण करायच्या आणि हे सगळ पाहत हा चीतदरवाजा आणि त्यावर डौलाने फडकणारा जरीपटका ताठ मानेने शिंग तुतार्यांचे आवाज ऐकत शिवरायांना मुजरे करायचा, त्याला आज कुठल्यातरी कामावर जाताना उशीर झाला म्हणून रिक्षावाल्याची वाट पाहणाऱ्या मुलीचा किंवा बदनाम झालेल्या मुन्नीचा बीभत्स आवाजातला आक्रोश ऐकावा व क्वचित पहावासुद्धा लागत होता.पण सांगणार तरी कुणाला आणि काय? खिन्न मनाने दरवाजाच्या पाठीवर मायेने थोपटत तो निघणार एवढ्यात त्यातल्या एका मुलाने आपल्या तोंडातील गोळीसारखा चघळण्याचा एक चिकट पदार्थ तोंडातून काढला, रबरासारखा ताणला आणि दरवाज्याच्या बुरुजावर दोन चीरेंच्या मधल्या फटीत चिकटवून दिला. त्याच पाहून आणखीही दोघांनी हेच केल. अनंत यातनांच्या कळा उठल्या बुरुजातून.."अरे नका रे अस करू..!!! हिरोजींनी मोठ्या प्रेमाने बांधलाय मला..." !!! पण व्यर्थ .. स्वतंत्र भारताचे ते सुजाण नागरिक रायगडावर स्वतःची आठवण ठेवून तिथून चालते झाले होते..हताश होत रायगड उठला....




असे हताश होण्याचे प्रसंग वारंवार येतात हल्ली.विशेषतः विजेरी पाळणा झाल्यापासून. सुशिक्षीत म्हणवणारी लोक येतात. जे पाणी पिऊन यांच्या पुर्वाजंनी मुघलांच्या, इंग्रजांच्या, पोर्तुगीजांच्या पार्श्वभागाला घाम फोडला होता त्याच गडावरच तेच पाणी त्यांना "मानवत" नाही म्हणून विकत घेतात बाटल्या आणि टाकून देतात इथेच. प्लास्टिकच्या पिशव्यातून आणलेले ते खाद्यपदार्थ संपल्यावर त्या पिशव्याही इथेच टाकून देतात..

आणि परवा तर हद्दच झाली..कुठलातरी प्रेमज्वराने बाधित झालेला मदन स्वतःच आणि ज्या रतीमुळे हा ज्वर जडला त्या रतीच नाव कसल्यातरी धारधार वस्तूने बदामात कोरत होता..आणि कुठे तर सिंहासनाच्या मागे जी राजवाड्याची भिंत आहे तिथे...ढसाढसा रडावस वाटल...उर बडवून घ्यावासा वाटला. स्वतःलाच कडेलोट करून घ्यावासा वाटला..!! सांगणार तरी कुणाला ??
कस समजत नाही यांना कि ज्या गडांवर, तिथल्या तटा - बुरुजांवर कधीतरी यांच्या भीमपराक्रमी पूर्वजांच आसूद सांडला होत त्याच रणक्षेत्रांवर - शिवक्षेत्रांवर आपण निर्लज्जासारखे विड्या विझवतो, दारूच्या बाटल्या फोडतो यासारख दुसर पाप नाही ते ?
किंवा आपल्या बापाची जागा आहे अस समजून मन मानेल तशी आणि तिथे घाण करणे यालाच कदाचित लोकशाही म्हणत असावेत !!! आणि हीच असावी बहुतेक व्यक्तीस्वातंत्र्याची व्याख्या ....!!!!




मग वाटत आज राजे हवे होते, युवराज हवे होते..या असल्या बेमुर्वतखोरांचे हात-पाय कलम करून त्यांना समोरच्या लिंगाण्यावर कायमच डांबून ठेवलं असत राजांनी....!!!!

दिवसभराच्या या जखमांनी विव्हळ होत तो तसाच बसून राहिला..सूर्यास्त झाला तसा तो उठला...रिवाजाप्रमाणे दरबारात जाऊन मुजरा केला आणि होळीच्या माळावरून परतताना क्षणभर तो थबकला...महाराजांसमोर थोडा वेळ बसून रहावस वाटल....मुजरा करून तिथेच चौथार्यावर बसून राहिला तो....पुतळ्याकडे पाहताना आठवल त्याला महाराजांचं पहिलं दर्शन !!!

जावळीच्या मोर्यांच्या पाठलागावर राजे आले होते..चंद्रराव दडून बसला होता आपल्या पोटात. त्याचा खात्मा करायला राजे वर चढून आले आणि आपला हा धिप्पाड देह पाहून हरखून गेले.म्हणाले, "गड बहुत चखोट, चौतर्फा कडे तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच. पर्जन्यकाळी कडीयावर गवत उगवित नाही आणि धोंडा तासीव एकच आहे.पाखरू बसू म्हणेल तर फांदी धरीत नाही. रायरी दशगुणी उंच.तख्तास जागा हाच गड करावा".माझ्या गुणांचं चीज करणारा पहिलाच राजा मला भेटला होता आणि मग राजांच्या दूरदृष्टीचे एकाहून एक प्रत्यंतर पुरावे येऊ लागले. हिरोजी इटलकरच्या हाती राजांनी सोपवलं आपल्याला आणि मग हिरोजींनी पोटाच्या पोराप्रमाणे सजवलं आपल्याला !!




मग उठला राज्याभिषेकाचा येळकोट ...... काय वर्णावा त्याचा थाट...त्याचा दिमाख...
आनंदनाम संवत्सरे, शालिवाहन शके १५९६, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला राजे सिंहासनाधीश्वर जाहले...आणि मी त्या सिंहासनारूढ राजाच्या राज्याची राजधानी झालो...आणि त्यानंतर लगेच आऊसाहेब गेल्या ....महाराज दक्षिण दिग्विजय करून आले आणि जे अंथरूण धरल ते पुन्हा ........!!! विचार हि करवत नाही....याच होळीच्या माळावरून महाराज शेवटच्या मोहिमेवर गेले...महाराष्ट्राला पोरक करून....
मग तो नराधम औरंग्या आला महाराष्ट्रात...पण महाराजांच्या आशीर्वादाने शंभूराजांनी गाजविलेल्या पराक्रमापुढे तो हतबल झाला...मारलं त्याने शंभूराजांना पण त्याच चितेतून एक एक ठिणगी बाहेर पडून त्यांच्या ज्वाळा बनल्या....राजा आणि राजधानी गमावलेली असतानाही हा महाराष्ट्र लढला.....प्राणपणाने लढला...आणि शेवटी इथेच त्या दिल्लीपतीची कबर बांधून शांत झाला.

औरंगजेबासारख्या कळीकाळाशी निकराची साहसी छातीजुंझ घेणाऱ्या महाराष्ट्राची कूस इतकी वांझ कशी होऊ शकते ? सह्याद्रीहि तोच, समुद्रहि तोच...आणि हि मातीही तीच जिच्या सौभाग्यसाठी लाखो आयांनी आपली कूस उजाड करून घेतली,....अनेक बापांनी आपल्या तरण्याताठ्या पोरांच्या तिरडीला खांदा दिला.....अनेक बायकांनी आपल्या कपाळावरच कुंकू हसत हसत पुसलं. आणि तरीही आपला उरलेला वंश सुद्धा महाराजांवर,
स्वराज्यावर आणि जरीपटक्यावर ओवाळून टाकला त्या मातीला हे देशद्रोहाचे, भ्रष्टाचाराचे, स्वार्थाचे करंटे आणि दळभद्री डोहाळे लागावेत याउपर दुर्दैव ते कोणत ???

मग अचानक तो भानावर आला ते पहारेकर्याच्या शीट्टीने....आणि स्वतःशीच हसत म्हणाला... "महाराज आता आज्ञा व्हावी ,आमचे रात्रीचे सोबती आले". मग उठला सावकाश....कमरेत वाकून मुजरा केला महाराजांना आणि तसाच चार पावलं मागे गेला पाठ न दाखवता.....तिथून वळणार एवढ्यात काहीस आठवल, आणि म्हणाला राजांना, "महाराज, तुम्ही बांधल्यापासून आज जवळ जवळ ३६० वर्षे झाली मला ... माझच वय एवढ तर
सह्याद्रीच किती असेल? म्हातारे नाही झालो पण म्हातारपणाची जाणीव मात्र होते आजकाल हे सगळ बघून !!! अफजल आणि औरंग्या सारख्या नराधमांबरोबर तुमच्या खांद्याला खांदा देवून लढलो पण आता आपलीच पोर उरावर बसून छाती फोडायला लागल्यावर काय करणार? महाराष्ट्र विसरला तुम्हाला ...करू लागला विटंबना तुमची आणि गडांची तरी बेहत्तर... पण या रायगडाच्या, सह्याद्रीच्या आणि त्या दर्याभवानी समुद्राच्या नसानसात आणि कणाकणात तुमचा आणि मासाहेबांचा महाराष्ट्रधर्माचा मंत्र अजूनही धगधगतोय". तुमच्या या स्वराज्यधर्माची विटंबना करायला हा सह्याद्री बिसलेरी च्या पाण्यावर पोसलेला नाहीये...तुमचा वसा-वारसा विश्वाच्या अंतापर्यंत मी असाच पुढे नेत राहीन ...हि तुमच्या आणि मासाहेबांच्या पायाची आण !!! फक्त एक मागण आहे महाराज..."आपले पाय परत एकावर लागावेत या गडाला !!! " तुमची वाट पाहत अशी कैक युगे बसेन मी....मग पुन्हा एकदा नौबती झडतील, शिंगांचा कल्लोळ उठेल, तोफांच्या आवाजाने सह्याद्री आणि मावळ्यांच्या रणगर्जनांनी सारा महाराष्ट्र दणाणून निघेल...एकवार या राजे, एकवार या...आणि हो एकटे येवू नका .... मासाहेब आणि युवराजांनी हि आणा संगती...

इतक बोलून आणि परत एकदा मुजरा करून तो चालायला लागला ...झोपायला किंवा कदाचित झोपेच सोंग घ्यायला !!! दोन्हीपैकी एक काहीतरी त्याला करावच लागणार होत...!!!




--
-- आपला,
|| श्रीशिवछत्रपती चरणी तत्पर, सारंग भोईरकर ||