"बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्ग सोडू नको,
संसारामध्ये ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको."
अनंत फंदींचा फटका आठवतोय. इतक्या साध्या शब्दांमध्ये त्यांनी आयुष्य कस जगावं हे सांगितलय.पण कधी कधी आयुष्याची वहिवाट थोडीशी बिकट करावीशी वाटते किंवा ती नकळत बिकट होते, थोडा त्रास होतो तीवरून चालताना पण इष्टस्थळी पोहोचल्यावर आपण जे केलय ते मागे वळून पाहिलं कि एकदम मस्त वाटत. तसंच काहीस झाल तीकोन्याला..
तिकोना उर्फ वितंडगड. कामशेतपासून आत पवनानगर, काळे कॉलनी भागाकडे एक रस्ता जातो. वाकड पासून सुमारे ३०-३५ कि.मी कामशेत आणि तिथून आत २०-२५ कि.मी वर "पेठ तिकोना" हे पायथ्याच गाव. औंध पासून एकूण अंतर ५७ कि.मी. घरातून निघायला तसा उशीरच झाला. ९ वाजले होते. बरोबर आशिषहि होता.NH - 4 वरून वाकड - चिंचवड - तळेगाव - कामशेत असं करत पायथा गाठला. जाताना रस्त्यात (हायवेवर) ४ कुत्री मागे लागली. या असल्या बेवारशी मित्रांची थोडी भीती वाटते मला.
पेठ तिकोना हे तस छोटस गाव. ग्राममंदिराच्या इथे गाडी लावली. तिथून पुढच गडाच्या पायवाटेपर्यंतच अंतर हे चालत जाव लागत.
ते १-२ कि.मी असेल. पण जिथून हि वाट चालू होते. तिथपासून फक्त चिखल होता. संपूर्ण चिखल. काही ठिकाणी तर पाय घोट्यापर्यंत चिखलात रुतत होते.चालण तर सोडाच साध उभ राहणहि जिकिरीच झाल होत. म्हणून मधेच एक short cut घेतला आणि "बिकट वाटेला" लागलो.
पण त्याआधी तुम्हाला एकंदरीत तीकोन्याची बहिर्र्चना सांगतो. याचा डोंगर हा जरा त्रिकोणी आकाराचा आहे म्हणून नाव तिकोना. आणि जो गड वसवला त्याचे नाव वितंडगड. याची खासियत म्हणजे याच्या "डोंगरधारा". डोंगरधारा म्हणजे डोंगराच्या माथ्यापासून थोड खाली एक उतरण चालू होते ती थेट पायथ्यापर्यंत. अशा ३ डोंगरधारा या डोंगरास आहेत.
एक म्हणजे पूर्वेकडची. दुसरी पश्चिमेला आणि तिसरी उत्तरेला. यात पूर्वेकडे जी धार आहे ती थेट तीकोनापेठेत येते. थोडक्यात तीकोनापेठ हे गडाच्या पूर्व - पायथ्याला असलेल गाव. इथून आपण चालायला सुरुवात करतो आणि हि पूर्व-डोंगरधार जी आहे तिला उजव्या हाताला ठेऊन मळलेली पायवाट धरायला पश्चिम-डोंगर्धारेपर्यंत चालत जातो. हीच ती वाट जी १-२ कि.मी ची असेल,
जी आत्ता संपूर्ण चिखलमय होती. आणि ती टाळावी म्हणून मी ज्या पूर्व-धरेला उजवी ठेऊन चालत होतो तिच्यावर जाण्याचा निर्णय घेऊन जंगलात घुसलो. पूर्व-धारेच्या माथ्यावर जायला आम्हाला जंगलातून जावं लागणार होत. तिथेही काही ठिकाणी चिखल होताच. आता संपूर्ण जंगलात असल्यामुळे धारेचा माथाहि दिसत नव्हता. पण तसच चालत राहिलो. आणि एका पठारासारख्या सपाट जागेवर येऊन पोहोचलो. तिथून धार दिसत होती पण वाट स्पष्ट नव्हती. तिथेच काही बैल चारत होते. म्हटलं बघू आवाज देऊन यांचा मालक वगैरे असेल. आवाज दिला आणि एक आजोबा काठी टेकत आले. त्यांनी वाट दाखवली.
त्यासाठी परत जंगलात शिरलो. थोड चाललो आणि आमच्या पासून एक १०-२० फुटांवर एक झाडातून अचानक एक पक्षी आपले भले मोठे पंख फडफडवीत दुसरीकडे उडून गेला. त्याचा तो आकार पाहून २ मिनिटे पुढे जावं कि नको अशा मनस्थितीत तिथेच थांबलो. कदाचित तो बहिरी ससाणा असावा कारण गरुड शक्य नाही आणि घार व घुबड यांचे पंख इतके मोठे नसतात. त्या शांततेला चिरत जाणारा तो त्याच्या पंखांचा आवाज अजूनही
स्पष्ट आठवतोय. मग तसेच पुढे गेलो आणि एका वळणावर थोडी चढण पार करून एकदाचे त्या धारेवर आलो आणि तिच्यावरून चालायला सुरुवात केली. तिथून उजव्या हाताला खाली पवना धरणाचा विस्तीर्ण जलाशय दिसतो.
ज्यावरून आम्ही चाललो होतो तीसुद्धा एक मळलेली पायवाटच होती. जिथे हि डोंगरधार डोंगराला मिळते तिथून एक मस्त वाट चालू झाली. आपल्या दोन पावलांना जितकी जागा लागते तितकीच जागा होती. उजव्या हाताला डोंगर आणि डावीकडे थेट उतार आणि दोन्ही बाजूला उगवलेलं गवत. ते तर आमच्याहि डोक्यावरून आणखी ३-४ फुट गेलेलं. वाट प्रचंड घसरडी होती. त्यात मधेच पाण्याचे ओहोळ लागायचे. तिथून जपून जावं लागत होत. मधेच एखादी चढण किंवा उतरण लागायची. एक वळसा घेऊन आता आम्ही तटबंदीच्या खाली पोहोचलो. तिथून पायर्या दिसत होत्या. पण या पायर्या वेगळ्याच होत्या. एकतर पायरीच्या ज्या भागावर आपण उभे राहतो तिथे फक्त अर्ध पाऊल मावेल एवढी जागा होती आणि पायरीची उंची मात्र जवळजवळ ३-४ फुट होती. त्यात त्यांच्यावर शेवाळ माजलेल. वरून पाणी येत होत. त्यातल्या त्यात एकच बर होत कि, खाचा नीट सापडत होत्या त्यामुळे आधार मिळत होता. त्यांचाच आधार घेत घेत वर पोहोचलो आणि एका दरवाजापाशी येऊन थांबलो. हाच गडाचा महादरवाजा. पण याची उंची मात्र फार नाही. १५ फुट वगैरे असावी. पण याच्या माथ्यावरही दोन्ही बाजूस ती नेहमीचीच फुलांची नक्षी आणि आतल्या बाजूस अडसाराची भोकं आणि बिजागार्यांचे होल्डर्स. तिथून आत गेलो. परत एक छोटी चढण आणि डावीकडच्या रस्त्यावरून जात असताना आणखी एक दरवाजा लागला. याचे नाव पालथा दरवाजा. तिथून थोड पुढे चालत गेलो कि हि वाट संपते आणि आपण एका सपाट जागेवर येतो. इथून वर बालेकिल्ल्यास जायला रस्ता आहे. पण या सपाट भागात डोंगरात खोदलेली एक दक्षिणाभिमुख लेणी आहे. जिच्यात एक तळजाईच मंदिर आणि त्या शेजारीच एक गुहा. राहयला हि जागा उत्तम आहे.
तिच्या समोर एक सुंदर तळ आणि शेजारी कातळकोरीव पाण्याच टाक आहे. तिथे सध्या एक नाथपंथीय साधू राहतात. आम्ही गेलो तेव्हा ते चुलीवर चपात्या करत बसले होते. अशा लोकांशी बोलताना थोडी भीतीच वाटते आधी कारण ती बरीच मुडी असतात. त्यांना आधी नमस्कार केला. मग ते जरा खुलले आणि आमची विचारपूस केली. मी त्यांची विचारपूस करणार होतो पण संन्याशाच कुळ आणि मुळ विचारू नये त्यामुळे देवीच दर्शन घेतलं. या गाभार्यात मधोमध माथ्यावर कोरलेलं एक सुंदर कमळ आहे.
इथून थोड पुढे गेल कि एक चुन्याचा घाणा लागतो. तो शिवकालीन आहे. त्याची जाती बघूनच हे पटत कि हे फक्त बैलच ओढू शकतात. घाण्याच्या पुढेच काही अंतरावर बालेकिल्ल्याच्या पायर्या चालू होतात. तश्या त्या साध्याच आहेत पण या संपूर्ण जिन्याचा जमिनीशी झालेला कोन हा नक्कीच ७०- ८० अंशातला असावा.कारण तिव्र चढण म्हणजे काय हे या पायर्यांकडे पाहून कळत.
आणि म्हणूनच हा जिना चढण्यासाठी आधार म्हणून दुर्गसंवर्धन समितीने दोन्ही बाजूस जाड वायर्स लावल्या आहेत.३५-४० पायर्या चढून गेल्यावर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. दोन बुरुजांच्या मधोमध बांधलेला सुबक दरवाजा.
याचे होल्डर्स गायब आहेत. इथून आत गेलो कि उजव्या हाताला लगेच एक टाक आणि राहण्याची जागा..पण पावसाळ्यात मात्र नाही राहता येणार. थोड पाणी गळत होत. दरवाज्याच्या समोरच एक जिना आहे जिथून बालेकिल्ल्याच्या सर्वात सर्वोच्च भागावर पोहोचता येत. तिथे गेल्या-गेल्या समोरच एक महादेवच मंदिर. आत्ता काही वर्षांपूर्वीच जीर्णोद्धार झालेलं. आत एक शिवलिंग आणि बाहेर नंदी. याच्या मागेच एक छोटीशी उंच जागा आणि त्यापलीकडे बुरुज. बस संपला बालेकिल्ला. पण यावरून उत्तरेस लोहगड-विसापूर दिसतात. याच्या पूर्वेस मावळ आणि पश्चिमेस कोरबारसे पेटा आहे. आणि सर्वात सुंदर म्हणजे थोडस ईशान्येस दिसणारा आणि तिन्ही बाजूंनी धरणाच्या पाण्याने वेढलेला तुंग उर्फ कठीणगडही दिसतो. पण पाऊस आणि धुक्यामुळे आम्हाला यातलं काही दिसलं नाही.
तसा तीकोन्याचा विस्तार हा फार मोठा नाही. लेणी, पाण्याची टाकी, मंदिर आणि दारूकोठाराचे अवशेष सोडता बाकी काही दिसत नाही. हा किल्ला महाराजांनी इ.स १६५७ च्या आसपास स्वराज्यात सामील करून घेतला. पेण वरून घाटमाथा चढून येणारे घाट नजरेखाली ठेवण्यासाठी याचा मुख्य उपयोग व्हायचा. पुढे मोगल सरदार अमानुल्लाखानाने १७०२ मध्य हा गड जिंकून घेतला आणि औरंगजेबाकडे निशाण म्हणून सोन्याच्या चाव्या पाठवल्या. पुढे २० फेब्रुवारी १७०७ ला औरंगजेब मेल्यानंतर मराठ्यांनी हा गड परत स्वराज्यात सामील करून घेतला.
मंदिराच्या मागे जिथे झेंडाकाठीची जागा आहे तिथे एक ग्रुप होता. त्यांना एकत्र करून एक मस्त घोषणा दिली. त्यांना खूपच आवडली. मला भेळ आणि बर्फी खायला दिली. ते एक बर झाल. नाही नाही म्हणत मी हि जरा घेतली कारण भूक लागलीच होती. चौकशी केल्यावर समजल कि तो पूर्ण ग्रुप coep चा होता. त्यांच्या बरोबर त्यांचे सर होते. S .E Mech चा होता. त्या सरांनी मला विचारलं "काय करतोस?". मी म्हटलं, "मी पण इंजीनिअरच आहे. फक्त वाया गेलेला.." त्यांचा निरोप घेऊन निघालो. त्यानंतर मग मंदिरात गेलो. अभिषेकपात्र भरलं. आरती केली. आणि बाहेर आलो.
आता काही फार बघण्यासारख नव्हतंच.म्हणून परत निघालो. दरवाज्यात येऊन परत एक घोषणा दिली. जाताना मात्र आम्ही तो महादरवाज्याचा अवघड रस्ता टाळला आणि त्याच्या विरुद्ध बाजूने म्हणजेच पश्चिमेच्या धारेकडे निघालो. इथून जाताना लेणीच्या पुढेच एक मारुती आहे. चपेटदान मारुती. जवळजवळ १५ फुट उंच आणि तितक्याच रुंद अशा दगडात असलेला हा शेंदरी मारुती चपात मारण्याच्या आवेशात हात उगारून उभा आहे. त्याच्या डाव्या पायाखाली एक राक्षसीण आहे जिचे नाव "पनवती". तिथेच बाजूला २-३ बाटल्यांमध्ये तेल होत. बहुतेक गावातल्या लोकांनी ठेवलं असाव. थोड-थोड तेल घातलं मारुतीला. मारुतिस्तोत्र म्हटलं एकदम खड्या आवाजात आणि निघालो.
धारेवर पोहोचायला २ दरवाजे लागतात.
ते पार केले कि धार आणि थेट खाली ती चिखलयुक्त पायवाट. तिच्यावरून चालण्यावाचून गत्यंतर नव्हत. ती तुडवत तुडवत गाडीपाशी आलो.
एव्हाना मोजे हे ४-५ तासांपूर्वी पांढरे होते यावर कुणाचाच विश्वास बसला नसता. आणि बुटांचा रंग हा अनेकविध झाला होता. गावांत कुठे नळ दिसला नाही, म्हणजे मीच फार थांबून बघितलं नाही. ज्या रस्त्याने आलो होतो त्याच्या बिलकुल विरुद्ध दिशेने पिरंगुट मार्गे जाणार होतो. मुख्य स्त्याला लागलो आणि लगेच एक मस्त ओढा दिसला. थांबून आधी मोजे काढले. ते फेकून दिले. बूट आणि पाय धुतले आणि वाटेला लागलो. इथून पुढचा रस्ता म्हणजे "हिरवे हिरवे गार गालिचे....." असा होता.
मावळ आणि मुळशीच्या सीमेवरून भातशेतीच्या मधोमध हा रस्ता जातो. अशी सुंदर निसर्गाची चित्रकला डोळ्यांचे पारणे फिटवतो. ती हिरवी, काहीशी पिवळी असलेली भातशेती. गुडघाभर चिखलात काम करत असलेले ते काटक शेतमजूर. हाडशी, कोळवण, भालगुडी अशी गावे आणि मग पौड. तिथून डावीकडे थेट पिरंगुट.
मध्ये पिरंगुटच्या इथे एक श्रीपाद नावाचं हॉटेल आहे. कधी गेलात तर नक्की थांबा आणि तिथली मिसळ आणि भजी नक्की ट्राय करा. तिथून निघालो. भूकुम - भूगाव - चांदणी चौक - बावधन - पाषाण - औंध या मार्गाने घरी.
थोडक्यात सांगू का ? तुमच्या कडे अर्धा दिवस मोकळा असेल. फार ट्रेकिंगची सवय नसेल पण गड तर पाहायचा असेल तर तिकोन्यासारखा गड नाही.
हो पण मी गेलो त्या मधल्या वाटेने जाणार असाल गडावर, तर मात्र जरा पावसाला संपू द्या. मी काय केल ते घरगुती भाषेत सांगू का ? सरळसोट वहिवाट सोडून मधली वाट घेतली म्हणजे कस?, घरी भात-वरण आहे. पण त्यातच जरा मजा आणावी म्हणून आपण वरणाला फोडणी देतो..पापड तळतो किंवा भाजतो.चटणी-लोणचहि घेतो. तेवढीच जरा मजा...!!!
मग तुम्हीही करा ट्राय एखाद्या विकेंडला. ट्रेकही होतो. भातशेतीही बघता येते. आणि हो मावळ तालुक्याला एक प्रदक्षिणाहि होते...!!!
अप्रतिम लिखाण....अगदी हुबेहूब तिकोना लेख वाचतानाच डोळ्या समोर उभा राहतो.....
ReplyDeleteDhanyavd Atul......
ReplyDeleteखूप छान लिहिला आहेस हा पण article ....
ReplyDeleteजागेवर बसल्या बसल्या संपूर्ण तिकोना गडाचे दर्शन झाले..... त्या बद्दल धन्यवाद.
या लेखातील सर्वांत जास्त मला आवडलेले जर काही असेल तर तू निवडलेली वेगळी वाट........
आणि तू जे म्हणालास कि 'जरा वेगळ्या वाटे जावे नेहमीच्या रस्त्यापेक्षा' ते योग्यच आहे. कारण जो पर्यंत आपण आपली नेहमीची वाट सोडत नाही तो पर्यंत नवीन रस्त्यांचा शोध लागत नाही. आणि मला असे वाटते कि हि रिस्क घेणे जास्त महत्वाचे आहे.
Rocket Singh Salesman of the Year मधील एक dialog आहे: 'Risk तो Spiderman को भी लेना पडता है | हम तो salesman है | '
जो पर्यंत आपण रिस्क घेत नाही तो पर्यंत आपण प्रगतीच्या वाटेवर नाही जाऊ शकत. आपल्या समोर कित्येक सारी उदाहरणे आहेत ज्यांनी अश्या पद्धतीचा हटके विचार केला आणि यश प्राप्त केले.....
असेच गड फिरत राहा आणि आम्हाला आणि तसेच सर्वाना या बद्दल माहित देत राहा. आजकालच्या पिढी मध्ये गडाबद्दल माहितीचा अभाव दिसतो....
तू उचललेले हे पाऊल उल्लेखनीय आहे....
Keep It Up .....
हर्षल,
ReplyDeleteखूप धन्यवाद..
"जो पर्यंत आपण रिस्क घेत नाही तो पर्यंत आपण प्रगतीच्या वाटेवर नाही जाऊ शकत." हे वाक्य मनावर कोरलंय..
तुझ्या आणि इतर मित्रांच्या अशा कौतुकामुळेच खूप उभारी राहते...आणि नव्या वाट धुंडाळाव्या वाटतात..
खूप खूप आभार
बाबा सारंगा !
ReplyDeleteतुमच्या 'या' वाटेचे वर्णन वाचूनच माझ्या पोटातील वाट सरकू लागली. आणि फोटो पाहून पोटात गडगड, गडगड होऊ लागले. अनंतफंदी परवडले पण तुमच्या फंदी (निदान माझ्यासारख्यानेतरी) पडू नये. हो. आपण मिळून गड पाहायचे ठरले आहे. ते पाहूच. पण एखादा "सज्जन" असणारा गडच पाहू. असला रांगडा नाही हो झेपणार....
हे देखील वर्णन खूपच सुरेख केले आहे. असे म्हणतात की निरुद्योगी मनुष्य सर्वात चांगल्या सूचना देऊ शकतो. त्या न्यायाने असे सुचवावेसे वाटते की अशा गड कोटांच्या भेटींची लेख मालिका तुम्ही उत्तम बनवू शकाल. आणि माझ्यासारख्या घरकोंबड्या लोकांची गडांशी थोडीफार ओळख होईल.
- गणेश देवळे