भाद्रपद कृ. ७ शके १९३३ (म्हणजे १९ सप्टेंबर, २०११) आम्ही मोडी शिकावयास प्रारंभ केला आणि अश्विन शु. १२ शके १९३३ (म्हणजे ८ ऑक्टोबर, २०११) या दिवशी आमची शिकवणी पूर्ण झाली प्रतिदिन सायंकाळी सूर्यास्तानंतर एक घटका समय सोडून (म्हणजे ६.३० वाजता) आमची शिकवणी सुरु व्हायची. शिकवणीचे स्थळ होते, "भारत इतिहास संशोधक मंडळ, सदाशिव पेठ, पुणे" आणि मास्तर होते श्री.मंदार लवाटे (सुप्रसिद्ध इतिहास संशोधक) बास.यापेक्षा जास्त मी प्राकृत मराठी बोलायचा किंवा लिहिण्याचा प्रयत्न नाही करू शकत.!!!
पण एक गोष्ट मात्र नक्की कि, आम्ही शाळा सोडल्यापासून (किंवा शाळेने आम्हाला सोडल्यापासून) फक्त दोनच मास्तर असे लाभले कि ज्यांच्या तासाला कधीच कंटाळा आला नाही आणि एक दिवस जरी चुकून तास बुडाला तरी मनाला रुखरुख लागून रहायची. त्यातले पहिले होते डॉ.विजय गोखले आणि दुसरे श्री.मंदार लवाटे.
संगणक आणि इतिहास हे माझे आवडीचे विषय आणि या दोन्ही मास्तरांनी त्या दोन्ही विषयांच्या माझ्या आवडीला पुरेपूर खतपाणी घातलं. मोडीचा क्लास सुरु होताना, मोडी म्हणजे ऐतिहासिक काळात पत्रव्यवहार करण्याची लिपी यापलीकडे तिच्याविषयी काहीच ठाऊक नव्हत आणि इतिहासाचा अभ्यासही महाराज, संभाजी महाराज आणि पेशवे यांच्यावर प्रकाशीत झालेलं ललितसाहित्य आणि इतर काही इतिहासकालीन संदर्भ ग्रंथ याच्या पलीकडे गेलेलं नव्हत. पण जसजशी शिकवणी पुढे जात राहिली तशा अनेक ऐतिहासिक गोष्टी किंवा गमतीजमती म्हणू हव तर, या समजायला लागल्या.
इ.स.वी सनाच्या १२व्या शतकात हेमाड पंथाकडून हि लिपी विकसित जाहली असा एक समज आहे. म्हणजे जवळ जवळ ९०० वर्षे हि लिपी अस्तित्वात आहे. महाराजांची, पेशव्यांची जवळ जवळ बरीच पत्रे हि मोडीत आहेत. पेशवे दप्तर म्हणून पुण्याच्या कौन्सिल हॉल ला एक संस्था आहे. तिथे ४ कोटी कागद (पत्रे) आहेत. इतिहास संशोधक पत्रांना कागद अस म्हणतात आणि अशा काही पत्रांना एकत्र बांधल्यावर त्याचा रुमाल होतो.
ढोबळमानाने मोडीचे ४ प्रकार होतात. १) शिवपुर्वकालीन मोडी (२) शिवकालीन मोडी (३) पेशवेकालीन मोडी (४) इंग्रजकालीन मोडी
यातल्या पहिल्या ३ प्रकारांना बोरुची मोडी अस म्हणतात आणि शेवटल्या प्रकाराला टाकाची मोडी असे म्हणतात. यातील बोरुची मोडी हि वाचण्यास सोपी पण शब्द लागण्यास कठीण कारण त्यावेळची बोलीभाषाहि आजच्यापेक्षा जरा निराळी होती. टाकाची मोडी हि वाचावयास क्लिष्ट पण शब्द लागण्यास सोपी आहे, कारण हिची भाषा हि बरीचशी अलीकडच्या काळातली पण टाक वापरला असल्याने अक्षरांचा आकार [फोंट] छोटा होत जातो..मोडीच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तीत कसलेही विरामचिन्हे नाहीत. त्यामुळे जरी तुम्हाला अक्षरओळख झाली तरी शब्द लागण हे कठीण असतं आणि ते कौशल्य फक्त सरावातूनच येत.
पत्र आणि तारखा यांचा परस्परांशी शंकर-नंदी किंवा गणपती-उंदीर यांच्यासारखा संबंध आहे. महादेव आहेत आणि नंदी नाही हे जस होत नाही
तसच पत्र आहे पण तारीख नाही अस होत नाही. या तारखांचीसुद्धा गम्मत आहे.
पूर्वी पत्रांवर फारसी किंवा मुसलमानी तारखा असायच्या. त्यांचे सुहुरसन, फसलीसन आणि हिजरीसन असे सन आहेत.
या प्रत्येक सनात अनुक्रमे ६००, ५९०, ६२२ वर्षे मिळवली तर तो इ.स.वी सन होतो.
आणि जर इ.स.वी सनातून ७८ वर्षे वगळली तर तो शालिवाहन शक होतो. तसेच फारसीमध्ये आकड्यांनाहि नावे वेगळी आहेत.
उदा. शून्य म्हणजे सुफ्र, एक म्हणजे इहीदे, चार म्हणजे अर्बा, दहा म्हणजे अशर, पन्नास म्हणजे खमसेन, शंभर म्हणजे मया आणि हजार म्हणजे अलफ इत्यादी.
आता हि तारीख बघा. सु || अर्बा खमसेन मया अलफ
यातील "सु ||" म्हणजे सुहुरसन : अर्बा म्हणजे ४ : खमसेन म्हणजे ५० : मया म्हणजे १०० : अलफ म्हणजे १०००
आता या सर्व आकड्यांची बेरीज ४+५०+१००+१००० = ११५४ येते. थोडक्यात हे सुहुरसनाच ११५४वे वर्ष आहे...
आणि यात जर आपण ६०० मिळवले तर ११५४ + ६०० = इ.स.वी सन १७५४ मिळते.....
आणि यातून जर आपण ७८ वगळले तर १७५४-७८ = शालिवाहन शक १६७६ मिळते.
फारसीतल्या महिन्यांची नावेही वेगळी आहेत. मोहरम, सफर, रबिलाबल, रबिलाखल, जमादिलावल, जमादिलाखर, रजब, साबान, रमजान, सवाल, जिल्काद, जिल्हेज हे ते बारा महिने होत. त्यामुळे "छ.१० मोहरम" याचा अर्थ मोहरम महिन्यातला १०वा चंद्र [किंवा दिवस] असा होतो. चंद्राचा उल्लेख आलाय कारण त्यांच्याकडे दिवसाचे मोजमाप संध्याकाळी चालू होत असे.
आपल्या राजाचा मोठेपणा कुठे आहे तर महाराजांनी मराठी महिने, तारखा आणि राज्याभिषेक शक वापरायला सुरुवात केली पण तरीही ते गेल्यावर पुढे परत फारसी तारखाच बघायला मिळतात ज्याची कारणे हि बरीचशी राजकीय आहेत. ६जुन १६७४ ते ६ जून १६७५ हा राज्याभिषेक शक १ होतो आणि सध्याचं वर्ष म्हणजे २०११-१२ हे राज्याभिषेक शक ३३८ आहे.
शिवाजी महाराजांचे तीर्थरूप श्री शहाजी महाराज यांच्याकडे शिवरायांच्या जन्माच्यावेळेस ६२००० गावांची जहागिरी होती आणि आदिलशाही दरबारी त्यांच वजन हे वजीरापेक्षाहि मोठ होत ज्याच कारण त्यांचा रणांगणावरचा अतुलनीय पराक्रम व त्याहूनही थोर अशी त्यांची राजकीय मुत्सद्देगिरी. पण यामागे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे कि एवढा पराक्रमी व थोर पिता लाभला असतानाही शिवाजी महाराजांनी स्वराज्याच स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरवलं.
परंतु फारसी भाषा हि काही ठिकाणी फारच नाजूक आहे. "साली आधी घरवाली" अशी एक म्हण आहे. बायको आणि मेव्हणी यांना फारसी नावे पहिली तर हे १००% पटत.बायकोला फारसीत "शरीत-ए-हयात" म्हणतात तर मेव्हणीला फारसीत "हमजुल्फ" असा शब्द आहे. नवर्याला "खाविंद" म्हणतात आणि लेखक या शब्दाला तर अतिशय सुंदर असा "साहिब-ए-कलम" शब्द आहे. या फारसीच्या लिपीस नास्तालिक असे म्हणतात. आपल्या मराठीची जी लिपी आहे तिला पूर्वी बाळबोध असे म्हणायचे (सध्या देवनागरी म्हणतात.)
शिवपूर्वकाल, शिवकाल, पेशवेकाल या सर्वांवर फारसीचा एक ठळक असा छाप आढळून येतो. किल्ला, रुमाल, जमीन, कागद, कारखाना, अंबरखाना, फर्जंद या आणि अशा कितीतरी फारसी, उर्दू शब्दांचा मराठीवर आघात झालेला दिसतो. आणि म्हणून राज्याभिषेकप्रसंगी महाराजांनी रघुनाथ पंडित व धुंडिराज लक्ष्मण व्यास यांना बोलावून घेतले व म्हटले कि "आपली भाषा यावनी भाषेमुळे लुप्त जाहली आहे. तरी तुम्ही या फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत प्रतिशब्द काढा" आणि मग "राज्यव्यवहार कोश" नावाचा ग्रंथ तयार झाला. असा कोश तयार करणारे छत्रपती महाराज हा पहिला राजा आहे. या ग्रंथात किल्याला ला दुर्ग; कारखान्याला संभारगृह; अंबरखान्याला धान्यकोश असे अनेक शब्द दिले आहेत.
पण दुर्दैव हे कि महाराज गेल्यावर हळूहळू परत हे भाषेवरील आक्रमण सुरु झाले आणि आता तर मराठी हि भाषा उर्दू, फारसी, हिंदी आणि मुख्यतः इंग्रजी इतक्या भाषांनी बाटलेली आहे. आजही आपल्याकडे अनेक संस्कृत पोथ्या ज्यात वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र, गणित, युद्धशास्त्र, आणि अशाच कितीतरी विद्यांच ज्ञान जे कदाचित जगाला तारू शकेल ते धूळ खात पडून आहे. का? तर वाचणार कुणी नाहीये.
पूर्वीचे वजनाचे हिशेब हे ज्या मापांमध्ये होत त्याबद्दलही बरीच माहिती समजली.
एक शेर म्हणजे ०.९६ ग्रॅम. ४ शेरांची १ पायली. १६ पायालींचा १ एक मण आणि २० मण मिळून १ खंडी होत असे. म्हणजेच छत्रपतींच जे सिंहासन होत ते ३२ मण सुवर्णाच म्हणजे जवळ जवळ १९३-१९५ तोळे सोन्याने बनविलेले होत. हे फक्त मी सोन्याच सांगतोय. आणखी हिरे, माणके, पाचू यांची मोजदाद वेगळीच.
अशीच मोजमापे अंतर व चलन मोजायची सुद्धा आहेत.
१ तसू म्हणजे करंगळी ते तर्जनी एवढ अंतर :: २४ तसू म्हणजे १ गज :: १ काठी म्हणजे ५ हात अंतर :: १ बिघा म्हणजे ४०० चौरस काठ्या :: १ पाड म्हणजे २० काठ्या :: १ चावर म्हणजे १० बिघे किंवा २४ रुके :: १ सजगणी म्हणजे ६ रुके.
३ पैचा एक पैसा :: ४ पैशांचा एक आणा :: १६ आण्याचा १ रुपया.
हि सगळी परिमाणे आपण अजूनही वापरू शकतो पण आपले विचार, आचार किंबहुना संपूर्ण जीवनच हे अनेक प्रमाणात इंग्रजाळलेल आहे. इंग्रजांच्या दुरदृष्टीच एक उदाहरण देतो. इ.स.वी सन १६७५ साली जेव्हा शिवाजी महाराज छत्रपती होते तेव्हाच इंग्लंड मध्ये जवळ जवळ ७० वर्तमानपत्रे होती.
इतिहासातील अनेक समज-गैरसमज सुद्धा या क्लासच्या निमित्ताने कळाले. त्यातलं पहिलं म्हणजे शनिवारवाडा ते पर्वती असल कुठलही भुयार नाही.
पुणेकर पाणी खूप वापरतात हा सध्याच्या राज्यकर्त्यांचा एक आरोप आहे ज्यावरून एक आठवल कि कात्रजवरून जे पाणी पुण्यात आणलं गेल त्यामुळे पुण्याच्या मध्यवर्ती भागातल्या अनेक हौदांमध्ये वाहून जाईपर्यंत पाणी असायचं आणि पूर्वीच्या काळी त्या हौदांवर सार्वजनिक स्नानगृहे होती...
पुण्याचे उल्लेख हे थेट ६व्या शतकातल्या ताम्रपटात सापडले आहेत आणि पुण्यातली जी कसबा पेठ आहे ती जवळ जवळ १५०० ते २००० वर्षे जुनी असावी असा अंदाज आहे.
असेच एकदा शिकवत असताना सरांनी एक हास्यास्पद गोष्ट सांगितली. "मोडी अभ्यासक्रमात ठेवावी कि नाही" यासाठी १९५१ साली सरकारने १२ जणांची एक समिती बनविली. त्यात ११ मराठी आणि १ इंग्रज होता..सरकारने तेव्हापासून मोडी अभ्यासक्रमातून काढून टाकली कारण शेवटच्या मतदानात ११ विरुद्ध १ अस चित्र होत. यातले ११ जण [जे मराठी होते] ते म्हणत होते कि मोडी नको आणि १ जण [जो इंग्रज होता] तो म्हणत होत कि मोडी ठेवा म्हणून. कारण ती तुमची संस्कृती आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या परंपरांची आणि संस्कृतीची होळी कशी होत गेली याच हे एक उत्तम उदाहरण आहे.
मध्यंतरी काही वर्षांपूर्वी फ्रेंच सरकारने अस जाहीर केल कि, फ्रेंच राज्यक्रांती व त्याबाबत असलेला असा एकही कागद आमच्याकडे उरला नाहीये जो आम्ही वाचला नाही आणि आपल्याकडे असे करोडो कागद आहेत जे अजूनही आमच्या वैभवशाली इतिहासाची व विश्वपराक्रमी पूर्वजांची अनेक रहस्ये आपल्या पोटात घेऊन पडून आहेत आणि त्यांच दुर्दैव अस कि ते वाचण्यासाठी आवश्यक असणार मनुष्यबळ उपलब्ध असूनही "इतिहासाविषयी उदासीनता" या एकमेव अवगुणामुळे आम्ही खूप मागे पडत चाललो आहोत.
पण एक मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे जे राष्ट्र आपल्या परंपरांची, संस्कृतीची नाळ तोडून फक्त इतरांच अंधानुकरण करण्यात धन्यता मानते, आधुनिकतेच्या नावाखाली खोट्या प्रगतीचे बुरखे पांघरून ज्ञान, विज्ञान, शास्त्र या बाबतीत महासत्तेचे तळवे चाटत बसते, त्याच वर्तमान तर भरकटतच पण भविष्यसुद्धा अंधकारमय होत जात..आणि याच उत्तम उदाहरण म्हणजे आपला धुमसता शेजार आहे.
असो. हा न संपणारा विषय आहे..पण आज जेव्हा जेव्हा मी एखादी विस्मयकारक ऐतिहासिक घटना वाचतो किंवा ऐकतो तेव्हा हे कळून चुकत कि आपण फक्त उदासीनतेमुळे म्हणा किंवा बेजबाबदार वृत्तीने म्हणा एका खूप महान व दैदिप्यमान अश्या ज्ञानसंग्रहाला काळाच्या पडद्याआड ढकलत चाललो आहोत. पण कधीतरी आपल्याला समज येईल असे वाटते आणि उमेद कायम राहते. आणि ते म्हणतात ना, "उम्मीद पे तो दुनिया कायम है"..मग माझी एवढी छोटीशी इच्छा जिवंत राहायला काय हरकत आहे?
--
-- आपला,
|| श्रीशिवछत्रपती चरणी तत्पर, सारंग भोईरकर ||
'किती सुंदर लिहितोस सारंग...अप्रतिम झालाय लेख.....'
ReplyDeleteअप्रतिम,खुप चांगला लेख लिहिला आहेस.
ReplyDeleteOne of your best.
प्रिय सारंग,
ReplyDeleteलेख खूपच अप्रतिम लिहिला आहे. आपल्या बोलण्यामधून माझा असा समाज झाला होता की आपण मोडी ही केवळ लिपी म्हणून शिकता आहात. हा लेख वाचून समजले की ते केवळ लिपी शिकणे नव्हते. त्याबरोबर मराठी भाषा, तिच्यावर अन्य भाषांचा झालेला प्रभाव, संस्कृती, इतिहास, वांगमय, इ. अनेकविध गोष्टी तुम्हाला शिकता आल्या. ही सांस्कृतिक संपदा जतन करून पुढल्या पिढ्यांना देत राहणा-या श्री. लवाटे सरांना मनःपूर्वक प्रणाम आणि धन्यवाद. तुमचेही अभिनंदन.
- गणेश देवळे, १५ ऑक्टोबर, २०११
@ Atul :--- thanks a lot mitra...ani tu hi ya sarv goshtincha sakshidar hotasach
ReplyDelete@ Prashant :--- thnks thnaks a million....
ReplyDelete@ Devale sir,
ReplyDeleteधन्यवाद सर,
अभिप्रायाबद्दल खूप आभार..हो हे खरय कि मोडी शिकताना
या इतर गोष्टींची खूप समजल्या आणि तसाही इतिहासाचा अभ्यास करत असताना
या सर्व गोष्टींचा अभ्यास आपोआप होतो...
सारंग,
ReplyDeleteफार छान लिहिले आहेस. मोडीच्या अनुषंगाने अनेक गोष्टी कळल्या, ज्या आजपर्यंत कोणी आवर्जून सांगितल्या नव्हत्या.
मोडी शिकण्याची माझीही खूप इच्छा आहे. तसेच, त्यानंतर मोडीचे फुकट वर्ग घेऊन इथे इच्छुकांना शिकविण्याचा पण मानस आहे. त्याची जरूर सुद्धा आहे. कारण तसे न केल्यास एक जुनी लिपी लुप्त होईल असे वाटते. जसे "मराठी वाचविण्या"चे प्रयत्न सुरु आहेत तसेच मोडी वाचविण्याचे सुद्धा प्रयत्न व्हायला पाहिजेत. मोडी पोस्टाने शिकता येईल का?
असेच लिहीत रहा.
--संदीप चित्रे, बडोदे.
संदीप सर,
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद..अभिप्राय दिल्याबद्दल..
होय, मोडी वाचविण्याची खूप गरज आहे...ती पोस्टाने तशी शिकता येणार नाही.
पण त्यावर तोडगा मात्र निघू शकतो...मी त्याबाबत तुम्हास सविस्तर मेल करेन.
छानच जमला आहे लेख.....
ReplyDeleteखूप च सुंदर लेख आहे....
या लेखातून तू ब-याच गोष्टी नवीन सुद्धा शिकवल्यात आम्हाला ....
त्याकाळातले शब्द, मोजमापाची Units , या सर्व गोष्टी माझ्यासाठी नवीन आहेत. so thanks
आणि उदासीनतेबाबत जर म्हणशील, हे नेहमीच होत आले आहे... आपण जगाला अनेकश्या नवीन गोष्टी जगाला दिल्या असत्या जर त्यांचा योग्य प्रचार झाला असता.
तू म्हटल्याप्रमाणे आपल्या परंपरांची, संस्कृतीची नाळ जर या भाषेशी निगडीत आहे तर तिचे जतन होणे गरजेचे आहे......
तू करत असलेले कार्य कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे......
पाहूयात.. तूच म्हटल्याप्रमाणे "उम्मीद पे तो दुनिया कायम है" लोकांना आणि सरकारला यातून काही समज येईल हि अपेक्षा......
सारंग,
ReplyDeleteखूपच छान आणि रोचक लेख लिहिलाय.
बरीचशी नवीन माहिती कळली. हेडस्टार्ट म्हणून बेस्ट आहे.
खरच आपले आभार . . .
ReplyDeleteइतकी अमूल्य माहिती दिल्याबद्दल
6 रूके म्हणजे आताची किती जमीन. Plz send me the details on WhatsApp 8412040583
ReplyDelete