रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रातील दुर्ग या
प्रकरणातील पहिलचं वाक्य, “संपूर्ण राज्याचे सार ते दुर्गे”.
शिवछत्रपतींच्या हरएक विचार व कृतीमागे दुर्गांच अधिष्ठान आहे. किंबहुना
शिवचरित्रातून दुर्ग वजा करताच येत नाहीत. अशा या दुर्गांविषयी मराठी जनांच्या
मनात निरतिशय आदर दिसतो. अनेक जण मग तो आदर, ते प्रेम दुर्गवर्णनात्मक
लेखांमधून किंवा दुर्ग संवर्धन मोहिमांमधून व्यक्त करताना आपण पाहतो. या दोन्ही
गोष्टींची आज जितकी गरज आहे तितकीच गरज दुर्गांच्या शास्त्रोक्त अभ्यासाला सुद्धा
आहे. डॉ. मिलिंद पराडकर यांचा “ प्राचीन भारतीय दुर्गशास्त्र आणि हिंदवी
स्वराज्याच्या दोन राजधान्या, राजगड व रायगड – एक तुलनात्मक
अभ्यास ” हा ग्रंथ(प्रबंध) ही गरज पूर्ण करतो.
दुर्ग या
शब्दाच्या इतिहासापासून सुरू होणारा हा प्रबंध आपल्याला अनेक वाटांवरून फिरवतो.
शिवरायांच्या दुर्गांकडे येण्याआधी डॉ. पराडकर प्राचीन भारतीय साहित्यात त्याचे
आलेले उल्लेख, त्यावर केलं गेलेलं भाष्य, दुर्गांची
मानवी जीवनाला असणारी गरज प्रतिपादन करतात. प्राचीन काळी हिंदुस्तान आणि जगभर
पसरलेले विविध दुर्ग, त्यांची ठळक वैशिष्ट्ये ते नमूद करतात.
असिरिया, इराक, TROY, ग्रीस, स्पेन, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, रोम, युरोप येथील काही
प्राचीन दुर्गांची माहिती देताना ते त्याची गरज व इतिहास या दोन्हींचे महत्व
सांगतात. भारतापुरतेच बोलायचे झाले तर हडप्पा संस्कृती,
वेदकाळ, पुराणकाळ यांमध्ये निर्मिलेले दुर्ग, त्यांचे साहित्य याचाही मागोवा या ग्रंथात आहे. मनूस्मृतीत सांगितलेले
दुर्गांचे प्रकार, रामायण-महाभारतातील दुर्गांचे उल्लेख, अग्निपुराण, देवीपुराण,
मत्स्यपुराण इ, पुराणांमध्ये आलेल्या दुर्गांबद्दलच्या माहितीला संक्षिप्त रूपात डॉ. पराडकर आपल्या समोर ठेवतात.
प्राचीन काळाची
ही सैर झाल्यानंतर मध्ययुगीन भारतीय दुर्गरचनेवर डॉ. पराडकर प्रकाश टाकतात. सुरुवात
अर्थातच सातवाहनांपासून होते. त्याहीपूर्वी होऊन गेलेल्या राजवटींनी दिलेले योगदान
महत्वाचे आहेच. विविध पुरावे देऊन ते हा निष्कर्ष मांडतात की,
“सातवाहन राजकुळ हे सह्याद्रीच्या शिखरांवर दुर्गलेणी रचणारे आदिम राजकुळ याविषयी
शंका व्यक्त करण्यास तसूभरही वाव नसावा हे वज्रप्राय!”. पश्चिम सागरावरून घाटमाथा
चढणारा व्यापारी माल, त्यासाठी झालेली बंदरांची आणि
घाटवाटांची निर्मिती आणि या घाटवाटा रक्षिण्यासाठी झालेली दुर्ग निर्मिती ही
सातवाहनराजांची महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे. या दुर्गांमद्धे जीवधन, चावंड, शिवनेरी, हडसर हे
दुर्ग येतात. त्याचबरोबर या दुर्गांच्या पोटात आणि इतर अनेक डोंगरांवर कोरलेल्या
लेण्या आणि दुर्ग – लेण्या यांचे परस्पर संबंध यांचाही ऊहापोह ते करतात. “पश्चिम
किनार्यावरील बंदरे - त्या बंदरांजवळील
घाट – त्या घाटांजवळ असलेले दुर्ग” याची एक यादीच सरांनी दिलेली आहे.
सातवाहनांपासून
सुरू झालेला हा प्रवास मग चालुक्याची राजधानी बदामी, शिलाहरांची राजधानी
पन्हाळा, यादवांची राजधानी देवगिरि,
बहमनी सुलतानांची राजधानी बीदर, आदीलशहाची विजापूर, निजामशहाची राजधानी अहमदनगर, कुतुबशहाची गोवळकोंडा
यावर चर्चा करून शिवरायांच्या दुर्गकारणापर्यन्त येतो.
महाराजांचे
स्वराज्य स्थापनेचे स्वप्नं, कोवळ्या वयात घेतलेली शपथ, केलेले पराक्रम हे आजवर अनेक ललित कलांचा विषय झालेले आहेत. मात्र काळाच्या
पुढे पाहण्याची दृष्टी असणार्या त्या राजाने दुर्गांचे ओळखलेले लष्करी व
प्रशासकीय महत्व आणि त्यामुळेच त्यांनी एकामागोमाग एक असे काबिज केलेले दुर्ग यावर
संदर्भ म्हणावे असे फार कमी लिखाण उपलब्ध आहे. तत्कालीन समाजजीवन, त्याला अनुसरून असणारे अर्थकारण आणि हे दोन्ही ज्यावर आधारित होते ती
दुर्ग या संकल्पनेचा थोरल्या स्वामींनी केलेला विचार, मग तो
दुर्ग रचनेचा असू दे, दुर्गाच्या भौगोलिक स्थानाचा असू दे
अथवा त्याच्या राजकीय व लष्करी गरजेचा असू दे, या सर्वाचा
पुरेपूर परामर्श पराडकर सरांनी या प्रकरणात घेतला आहे. दुर्ग जर नव्याने बांधायचा
असेल तर पर्वतशिखराची निवड करताना काय निष्कर्ष लावावेत,
प्रादेशिक दुर्गमता कशी ओळखावी आणि अगोदरपासून अस्तीत्वात असलेल्या दुर्गांची
बांधकामे स्वराज्याच्या लष्करी गरजेस कशी पोषक ठरतील याकडे शिवछत्रपतींनी अचूक
लक्ष पुरवले. बांधकामे करताना चुना (शंखशिंपले अथवा चुंनखडीचा), दगड (जो अनेक वेळा त्याच डोंगरावर खाणी काढून घेतला जाई आणि मग त्या
खाणींमध्ये पाणी साठवून ते तलाव म्हणून वापरले जाई) कुठला व कसा वापरला जायचा, बांधकामसाठी शिस कधी वापरात यायचे, लाकूड कसे व
कोणते, बांबू कुठून आणावे, गडाच्या
घेर्यात कोणती झाडी असावी, कोळसा कसा असावा यावरही बरीच माहिती
ग्रंथात आलेली आहे.
“...He constructed new ramparts around jinji, dug ditches, erected towers, created basins and executed all these works with such perfection, which European art would not have denied.”
महाराजांच्या जिंजीच्या बांधकामाबद्दल मदुरेस तत्कालीन जेसुईट आंद्रे
फ्रेयर वरील उद्गार काढतो. याचप्रमाणे फ्रेंच प्रवासी बार्थलेमु अबे करे, ग्रँट डफ, सर यदूनाथ सरकार व शिवरायांचा पोर्तुगीज
चरित्रकार कोस्मा द ग्वार्दा यांचेही उल्लेख या प्रकरणात येतात.
दुर्ग (किंवा
कुठलीही मानवी वसाहत) वसवताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी. पाणाड्याकडून गडावरील
जीवंत झर्यांचा शोध घेऊन (यासाठी सरांनी वराहमीहिराच्या ‘बृहतसंहितेतली’ एक गोष्ट सांगितली आहे.) त्या ठिकाणी तलाव किंवा टाके बांधले जाई.
शिवरायांच्या कुठल्याही गडावर पाणी नाही असं दृष्य आजही दिसत नाही.
गड उभारताना
त्यात सहभागी असणारे सर्वजण म्हणजे ज्यास गडाची कामगिरी सांगितली आहे तो, बेलदार, पाथरवट, गवंडी, सुतार, लोहार, कुंभार, वडार, कोंगाडी, दुर्गांचे नकाशे काढणारी, संकल्पित आराखडे काढणारी
चितारी, रेखल्या आराखड्यानुसार सर्व काम होते आहे की नाही किंवा
काही बदल करावयाचे असल्यास ते कसे यासाठी स्थपति आणि या सर्वांच्या कामाचा तपशील
डॉ.पराडकरांनी ग्रंथात समाविष्ट केलेला आहे. गड वसविण्यासाठी लागणारे बारा
बलुतेदार (यादी बरीच मोठी आहे), त्यांची कर्तव्ये, शिकलगार (हत्यारांना धार लावणारे), गडाच्या दैनंदिन
कामकाजासाठी लागणारे मनुष्यबळ वगैरे अनेक गोष्टींची उत्तम माहिती अभ्यासांती
ग्रंथात आली आहे.
दुर्गांचे रक्षण, त्यांची
बळकटी किंबहुना दुर्ग हेच स्वराज्याचे सर्वस्व असे मानून दुर्गांची व्यवस्था शिवकाळात
कशी होती यावर काही विचार/मुद्दे सरांनी मांडले आहेत. “दुर्गांचा वेगळा विभाग नव्हता
कारण दुर्ग हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होता." त्यावरचे अधिकारी, हवालदार, सरनौबत, सबनीस (सेनालेखक), कारखानीस, तटसरनौबत कसे व कुठून नेमावे यासाठी आज्ञापत्रात
दिलेली मार्गदर्शक तत्वे या ग्रंथात समाविष्ट आहेत. या अधिकार्यांचे काम काय, त्यांचे पगार, त्यांच्या बदल्या, नेमणुका, त्यांच्याकडून चाकरीत कसूर झाल्यास काय करावे
वगैरे अनेक तपशील मांडले आहेत.
गडास दरवाजे कसे, किती, कुठे असावे, पाण्याची सोय, इमारतींची
जागा, कोठारे, शस्त्रागार वगैरे अनेक छोट्या
गोष्टी ज्या आज्ञापत्रात किंवा कौटिल्याच्या अर्थशास्त्रात आल्या आहेत त्याही इथे नमूद
करून त्यावर चर्चा केली आहे. हे केवळ गिरीदूर्गांच्या बाबतीत नव्हेच तर महाराजांनी
जे जे जलदुर्ग उभारले त्या सर्वांच्या बाबतीत हे लागू पडते.
इथवर पोचेपर्यंत
दुर्ग, त्यांचा इतिहास, भूगोल, त्याची
उभारणी, देखभाल, त्याभोवतीचे अर्थकारण वगैरे
बद्दलची आपली अनभिज्ञता बर्याच प्रमाणात दूर झालेली असते. विषयास शास्त्रीय आधार मिळावा
म्हणून सरांनी जागोजागी रामचंद्रपंत अमात्यांचे आज्ञापत्र, सभासदाची
बखर, फिलो ऑफ बायझान्टीअमचे लिखाण, कोटील्याचे
अर्थशास्त्र व इतर काही साहित्य यातील दाखले दिले आहेत.
शिवरायांनी आयुष्यभर
जी दुर्गसाधना केली तिला आलेली गोमटी फळे म्हणजे राजगड व रायगड. या शिवरायांच्या दोन
राजधान्या. रायगड तर अभिषिक्त राजधानी. या दोन्ही दुर्गांचा इतिहास, भूगोल, कालपट, त्यांचे वास्तुविशेष, त्यांचे
महत्व (लष्करी व प्रशासकीय) शेवटच्या २ प्रकरणांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जिथे
जिथे गरज आहे तिथे तिथे सरांनी या गडांवरील विविष जागांची, वास्तुंची
तुलना केली आहे.
राजगडाचे चारही
भाग (बालेकिल्ला व तीन माच्या), रायगडाची चारही टोके (भवानी, टकमक, श्रीगोंदे, हिरकणी), बालेकिल्ला, दोन्ही गडांवरील उपलब्ध पाण्याचे साठे, पाहर्याची ठिकाणे, विविध दिशांना असणारे दरवाजे, दोन्ही गडांची महाद्वारे, त्यावरील शिल्पे (जो एका वेगळ्या
संशोधांनाचा भाग ठरावा), समाध्या, बुरूज, तटबंदया व त्यांचे तपशील, वाड्यांचे व चौथर्यांचे अवशेष, बाजारपेठ, गडांवरील विविध देवता व त्यांची मंदिरे, शौचकुपे, स्नानगृहे, जलविसर्ग
व्यवस्था, सदर, दरबार, धान्यकोठारे, खजिना कोठारे, रायगडाच्या
राजदरबारातील ध्वनियोजना व तिचे शास्त्र, नगारखाना, रायगडावरील सिंहासन, गडांवर व जवळपास असणार्या लेण्या, गडांवर पावत्या होणार्या वाटा, त्याभोवतालची अरण्ये, गडांवरून दिसणारे इतर दुर्ग, व्याघ्रमुखे, यक्षमुखे, गडावरील घडलेल्या घटना व त्यांचा कालपट, गडावर त्याकाळी होणारे दैनंदिन व्यवहार, शिवोत्तरकाळात
गडाच्या वास्तूत घडवलेले बदल, सध्या डागडुजीच्या नावाखाली पुरातत्व
खाते करत असलेले विद्रूपिकरण या आणि अशा असंख्य बाबींवर भरपूर चर्चा डॉ. पराडकरांनी
केली आहे.
रायगडाच्या बालेकिल्ल्याचा
केलेला स्थापत्यशास्त्रीय अभ्यास, घेतलेली मोजमापे आणि त्यावरून नोंदवलेली निरीक्षणे, उदा: सर्व वास्तु बांधताना २:१ या scale मध्ये बांधण्यात आल्या आहेत. हे प्रमाण (scale) आजच्याच
नव्हे तर सार्वकालिक स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने उत्कृष्ट मानले जाते. राजसभा म्हणजे
दरबारात आजही कार्यरत असलेली ध्वनिव्यवस्था जीमुळे सिंहसनाजवळ उच्चारलेला प्रत्येक
शब्द हा राजसभेत कुठेही ऐकायला येऊ शकतो आणि दरबारात इतरत्र केलेली साधी कुजबुजही सिंहासनाजवळ
ऐकायला येते. हा एक शास्त्रीय चमत्कार आहे. फक्त ६ जून या दिवशी पूर्वेकडे उगवलेल्या
सूर्याची किरणे थेट सिंहासनाजवळ येतात हे सुद्धा सूर्यभ्रमण नकाशा (sun path diagram) काढून सिद्ध केले
आहे. आणि यासाठीच नगारखान्याची इमारत एका विशिष्ट कोनात बांधलेली आहे. ही सर्व अचाट
शास्त्रीय कृत्ये करणार्या हिरोजी इंदुलकरांना कशाकशाचे ज्ञान होते? जितकी ही कृत्ये आणि स्थापत्य अचाट, अनाकलनीय आहेत तितकेच डॉ. पराडकरांचे संशोधनही थोर आहे हे आपल्याला प्रबंध
पूर्ण वाचल्यावर मान्य करावे लागते. हे सर्व करण्यासाठी त्यांना जवळ जवळ ३५०हून अधिक
वार्या दोन्ही गडांच्या कराव्या लागल्या. आणि नुसत्या याच नाही तर इतरही अनेक दुर्गांच्या.
थोडीथोडकी नव्हे तर ३५ वर्षांची ही साधना. हे करताना त्यांना काय काय सहन करावे लागले
असेल, जसे आनंदाचे, अभिमानाचे क्षण आले
असतील तसेच अपमानाचे, निराशेचेही आले असतील. पण शिवछत्रपतींचा
पृथ्वीमोलाचा आशीर्वाद सदैव मस्तकावर आहे अशी भावना ते स्वतः व्यक्त करतात. या दुर्गंमुळेच
आयुष्यात कधी पाय वाकड्या वाटेवर पडला नाही आणि यांमुळेच गो.नी.दांडेकरांसारखा प्रेमळ
मार्गदर्शक या वाटेवर लाभला. त्याचबरोबर जुन्या-जाणत्या संशोधकांचे संशोधन, ऋण डॉ. पराडकर नमूद करायला विसरत नाहीत. या विषयावर अजून सखोल अभ्यास, संशोधन होणे गरजेचे आहे असे डॉ. पराडकर शेवटी म्हणतात.
डॉ. मिलिंद पराडकरांनी
शिवरायांच्या दुर्गसाधनेची मांडलेली, तर्काच्या, इतिहासाच्या काटयांवर घासलेली, ही एक शास्त्रशुद्ध बखर आहे, असं मला वाटत. बाबासाहेब
म्हणतात, “वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेडी माणसेच
इतिहास निर्माण करतात”. डॉ. पराडकर हे त्या पंथातले एक भाग्यवंत. त्यांना लागलेल वेड
हे त्यांनी आपल्यासमोर ठेवलय. ते सर्वांनी आवर्जून वाचावे असेच आहे. निर्विवादपणे हा
ग्रंथ मराठी इतिहास आणि दुर्ग साहित्यामध्ये स्वतःचे असे स्थान निर्माण करेल. शिवछत्रपतींचे आशीर्वाद आणि डॉ. पराडकरांचे कष्ट असे थोडीच वाया जाणार आहेत? J
sarang...apratim likhaan jhalay
ReplyDeleteMasta!!!!
ReplyDeleteधन्यवाद सारंग, छान प्रकारे तू ह्या पुस्तकाचे वर्णन केले आहे. खरच खूप दिवसांपासून अश्याच आशयाचे पुस्तक शोधत होतो, कि ज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप सुंदर प्रकारे सांगितल्या असतील. नक्कीच त्यांचे काम महान आहे आणि दुर्ग साहित्यामध्ये त्याचे वेगळे स्थान नक्कीच निर्माण होणार ह्यात शंका नाही.
ReplyDeleteI feel motivated to read that book,after reading such great description of the book.
ReplyDeleteVery nice writing Sarang. Thank you for giving such brief description of book and motivating us to read it.
ReplyDelete