"लवलवथी विक्राळा ब्रम्हांडी माळा विषे कंठकाळा त्रिनेत्री ज्वाळा..."
शंकराची आरती अशी मस्त रंगात आली आली होती, स्थळ होत राजगडाच्या बालेकिल्ल्यातल ब्रम्हऋषी मंदिर.
फार तर १० * १० च ते दगडी मंदिर.वरती पत्र्याच छत.एक लाकडी दार.एक लाकडी खिडकी.आत एक शिवलिंग आणि त्यावर एक अभिषेकपात्र.बास संपलं मंदिर...!!!
छताचे पत्रेही बहुतेक आत्ता बसवले असावेत, शिवकालीन वाटत नाहीत ते.
आणि या सर्वांच्या जोडीला होता सह्याद्रीचा तुफान पाऊस, सुसाट वारा आणि प्रचंड धुकं.
आरती झाली, मंत्रपुष्पांजलीहि झाली. चंद्रकोर तळ्यातून पाणी आणून अभिषेकपात्र भरलं
आणि प्रसन्न मनाने आम्ही बालेकिल्ला पाहायला गेलो.....
तेव्हा नाही वाटल काही पण पुण्यात घरी आल्यावर निवांत बसलो तेव्हा मात्र खूपच प्रकर्षाने आठवल ते मंदिर.
तसं पाहायला गेल तर राजगडाच्या पद्मावती माचीवरील पद्मावती देवीचं मंदिर हा तर हेमाडपंथी बांधकामाचा सर्वांगसुंदर नमुना आहे.
पण हे ब्रम्हऋषी मंदिर फारच डोक्यात बसलं..तिथली ती एकटीच असलेली महादेवाची पिंड, आणि तिच्या सोबतीला ते अभिषेकपात्र. आरती करताना अस वाटत होत कि खरच ऐकत असेल भगवान महादेव हि आरती. ९ मुलांनी कुठलाही महागडा धूप, कापूर, पंचारती आणि कसलाही किमती नैवेद्य न वापरता केलेली.
भक्तांची रांग नाही, दक्षिणापेटी नाही, संगमरवरी फरश्या, खांब नाहीत.देवामध्ये आणि भक्तांमध्ये तथाकथित बडव्यांनी उभी केलेली कुठलीहि संरक्षक भिंत नाही. कुणीही याव आणि दर्शन घ्याव. अगदी थेट पिंडीला हात लावून.तुमच्या पगारावर किंवा खिशातल्या लक्ष्मीवर तुम्ही दर्शन गाभार्यातून घ्यायचं, सभामंडपातून घ्यायचं कि आणखी कुठून घ्यायचं हे ठरवायला तिथे कुणीच नव्हत कारण तो देव कुणाच्याही नवसाला पावणारा नव्हता. म्हणून तिथे कुठलाही ट्रस्ट नव्हता, राजकारण किंवा सत्ताकारण नव्हत आणि सर्वात महत्वाच म्हणजे तिथे कसलही "अर्थकारण" नव्हत...!!
तसा तो महादेव अगदीच निरुपयोगी आहे; नाही का? कारण कुठलाही मंत्री, आमदार, खासदार किंवा एखादा सिनेनट, नटी किंवा एखादा क्रिकेटर, खेळाडू तिथे येणार नव्हता. घोटाळ्यात सापडलेला लोकप्रतिनिधी किवा प्रशासन अधिकारी तिथे येऊन त्या घोटाळ्यातून सोडवण्यासाठी देवाला किंवा त्याच्या या एजंटांना लाच देणार नव्हता. तिथ येऊन प्रसारमाध्यमांना एखादा बाईट देणार नव्हता..छे !! असा कुठे देव असतो का.?
देव म्हणजे किमान ३-४ किलोमीटरची रांग..पण ती सामान्य भक्तांची बर का ? मग त्यांच्याहून थोडे श्रीमंत वेगळ्या रांगेत.मग व्ही.आय.पी आणि मग व्ही.व्ही.आय.पी !!!
भारतीय समाज हा नेहमीच असा वाटला गेलाय..पूर्वी या रांगा जन्मावर ठरायच्या आता पैशावर ठरतात इतकाच काय तो बदल.
मग त्या देवाला ज्याने सर्वात जास्त लाच (माफ करा पण हाच शब्द सुचतोय मला ) दिली असेल त्याचं नाव किंवा वंशावळ तिथे कोरायची. आणि त्याच्या पुढच्या किमान २० पिढ्यांनी त्या लाचेवर सामान्यांना ताटकळत ठेवून आपल्याला हव तेव्हा दर्शन घ्यायचं हिच आजच्या देवस्थानाची व्याख्या आहे.
भारतातल्या एका सर्वात मोठ्या देवस्थानाचे पुढच्या ३० वर्षांचे अभिषेक आत्ताच बुक झालेत म्हणे. म्हणजे थोडक्यात या "भक्तांनी" देवाला स्वतःच्या आर्थिक ताकदीने जखडून टाकलंय. काय बिशाद आहे देवाची कि तो यांना भेटणार नाही त्या ठरलेल्या तारखेला. उगीच का लाखभर रुपये ओतलेत ???
आणि खर सांगू तर हल्ली देवालाच भित्र करून टाकलंय आम्ही. देवळाच्या भोवती बुलेट प्रुफ काचा बसवून आणि सशस्त्र रक्षकांचा पहारा बसवून.
फार लांब गेलाय ना देव आपल्यापासून? दगडूशेठचच उदाहरण घ्या ना. तो बाप्पा माझ्या लहानपणी म्हणजे एक दहा-बारा वर्षांपूर्वी खूप आपलासा वाटायचा.शाळेतून सुटल्यावर घरी जाताना वाटेवरच होता तो. गर्दी तेव्हाही असायची पण "पहारेकरी" नव्हते तेव्हा तिथे. सी.सी.टिव्ही कॅमेरे पण नव्हते..निर्धास्त होता तेव्हा दगडूशेठ !!!
काय दुर्दैव आहे ना ? देवादेवातही किती फरक पडलाय किंवा आपण पाडलाय ? धर्म तोच, देवही तोच...फक्त जागा चुकलीये......
म्हणूनच कदाचित दगडूशेठ "श्रीमंत" आहे. आणि स्वराज्याच सोनेरी स्वप्न पूर्ण करताना शुभाशीर्वाद लाभावेत म्हणून महाराजांनी वसवलेला तो महादेव, ती पद्मावती, तटा-बुरुजांवरचे आणि माच्यांवरचे मारुती, गणपती आज असलं तर छपराखाली नाहीतर तसेच उघडे-बोडके बसून आहेत.
म्हणूनच या श्रीमंत देवांकडे किंवा बाबांकडे जायला नको वाटत..त्यांच्या मंदिरांसामोरून जातानाहि पूर्वी सहज केला जाणारा नमस्कार हल्ली नाही करावासा वाटत.
पण जेव्हा अशा डोंगर-दर्यातले एखाद्या गळक्या कौलारू मंदिरातले देव भेटले कि मग मात्र हात नकळत जोडले जातात.,कारण त्यांना कधीतरी स्पर्श झालाय महाराजांचा, मासाहेबांचा,
संभाजीराजांचा आणि कितीतरी अज्ञात मावळ्यांचा....
मग तिथे कशाचीही गरज नसते,,,,ना तबक, ना कापूर, ना निरंजन...फक्त मनात उदंड श्रद्धा आणि प्रेम.आणि तसही देवाला तरी याहून जास्त काय हवं असत?
त्यामुळेच बहुधा मला तरी माझा देव इथेच दिसतो., इतरांच मला माहित नाही !!!!!
--
-- आपला,
|| श्रीशिवछत्रपती चरणी तत्पर, सारंग भोईरकर ||
'एक नंबर सारंग....खूप छान लिहिलयस'
ReplyDeleteसारंग सुंदर विचार आहेत
ReplyDeleteखूपच सुंदर
@Atul :- Dhanyavad Mitra !!!
ReplyDelete@ Pravin:- Khup khup Dhanyavad!!!
ReplyDeleteफारच सुंदर लिहिला आहे हा लेख....
ReplyDeleteदेवावर लेख असावा आणि तो पण तुझ्या लेखणीतून साकारलेला.... (थोडसे पचायला जड जात आहे....)
तरीपण फारच सुरेख विचार आहेत. आजकाल देव या शब्दातील भक्ती हरवून त्याची जागा पैसा या शब्दाने घेतली आहे.
देवाच्या भक्ती च्या नावावर जे काही थोतांड या सर्व trust च्या लोकांनी चालवले आहे ते पाहून खरेच राग येतो.
देवस्थाने हि भक्तीची स्थाने नसून पैसे कमावण्याचा अड्डा बनला आहे असे वाटते.
माझ्या मते खरा देव हा प्रत्येक माणसात असतो. आणि आपल्या मानवाधार्माचे आपण पालन केले म्हणजे आपण देवाची भक्ती केली असे माझे मत आहे.
असेच विचारांना खाद्य पुरवणारे लेख लिहित जा........
धन्यवाद हर्षल,
ReplyDeleteतुझ्या या अशा प्रोत्साहनामुळेच लिहिण्यास उभारी येते..
धन्यवाद
This comment has been removed by the author.
ReplyDeleteसारंग मित्रा खरच खूप छान लेख लिहीला आहे.
ReplyDeleteजो अनुभव तुला राजगडावर आला तोच अनुभव मला अम्रुतेश्वर मदिरांमधे(रतनवाडी) आला.
सुमारे १२ व्या शतकामधे हे मंदिर बाधले आहे, त्यामधील शिवलींग हे पाण्यात असते, ते खरचं एवढे सुंदर आहे कि वर्णन करता येणार नाही.
तेथे मला खुप प्रसन्न वाटले आणि वाटले की खरच एवढा साधेपणा, शांतता आपल्या स्व:ता मधे आणला तर ही प्रसन्नता कायम टिकुन राहील.
खरचं देव हा पैशांचा भुकेला नसुन तो साधेपणा, भक्तिचा भुकेला आहे पण आजकाल सगळे फ़क्त पैश्यांच्या मागे लागले आहेत.
परवाच पेपरात वाचले की शिरडी सस्थांना कडे आहेत ७२७ कोटी रुपये आणि सोने चांदी तर कही किलॊंमधे आहे तसेच दर दिवशी किमान १ लाख रुपये जमा होतात. हे फ़क्त तिथेच नाही तर आपल्या पांडुरंगाकडे पण ११ कोटींची संप्पती आहे.
तसेच अजुन खूप देवस्थानांची खूप सविस्तर माहीती होती...
खरचं ह्या पैश्यांचा संचय करने गरजेचे आहे का ?
आता एकिकडे अशी काही देवस्थाने आहेत तर दुसरीकडे ते शेगांव आलेला सर्व पैसा हा भक्तांच्या कल्याना करता खर्च करने हेच त्यांचे धेय्य, तसेच ह्या पैश्यांच्या कारभारात भारी परदर्शीपणा.
आता असा हा विरोधाभास दिसतो म्हणुन मला तिथला त्या भव्य पणा मधे पण साधेपणा वाटतो व तिथे स्वामींचे दर्शन घेताना मला तेवढेच प्रसन्न वाटते.
शेवटी काय सगळ्या संतानी आपल्याला हेच सागितले आहे ’देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर’ त्याला शोधा आपल्याला ही प्रसन्नता कायम मिळेल .......
मित्रा असेच दर्जेदार लेखन करत रहा .....
धन्यवाद संदीप,
ReplyDeleteखर सांगू तर हि देवस्थान त्यांच्याकडच्या संपत्तीने समाजकार्य करतातही या बद्दल वाद नाहीच...
पण ह्यापेक्षा जास्त खुपत ते या देवस्थानच्या ट्रस्टवर येण्यासाठी किंवा आल्यवर त्यंचा वापर जो राजकीय
रंग उधळायला होतो त्यामुळे फार वाईट वाटत...आणि मग त्यातून भ्रष्टाचार, सत्ताकारण चालू होत...
आणि यावर अंकुश ठेवायला कुठलाही कायदा नाहीये,,, पण भविष्यात तो होईल अशी अशा करूयात...
Excellent Sarang.treat to read...
ReplyDeleteAmruata Bothe Said,
ReplyDeleteApratim lekh sarang.....absolutely agreed to the fact u said...
khara dev to tithech....
Many Thanks...to give us the opportunity to read such nice stuff..
अदभुत, अनूठा, असामान्य.....................लेख ! मित्रा तू जे बुलेटप्रुफ म्हणतोय ना ते तुझ्या लिखाणाने त्याचं चीन्धळया करून देवाला गाठलं!
ReplyDeleteजय शिवाजी जय भवानी................ श्रीशिवछत्रपती समर्थक अभिषेक चीतवर
प्रिय सारंग,
ReplyDeleteहा लेख म्हणजे एक जळजळीत अंजन आहे. कारण तो डोळे उघडे ठेऊन लिहिला आहे व म्हणूनच तो अनेकांचे डोळे उघडेल.
अहो, हल्ली लोकांना "पावरफुल", "HOT" देव हवा असतो ही साधी गोष्ट तुम्हाला कशी कळू नये ? आश्चर्य आहे !! गरीब देव थोडाच "अर्जंट" प्रसन्न होणार आहे ? त्याला देणगीच्या नावे कांही लाच नको का द्यायला ? तुम्ही इथल्या व्यवहारात अगदीच अडाणी दिसता. देवाने केवळ नम्र, गरीब भक्तांच्याच उपयोगी यायचे - हे त्याचे underutilisation आहे. देव अर्थकारण, समाजकारण, राजकारण यांमध्ये सुध्दा उपयोगी येतो. ही "व्यवहार्यता" कशी माहित नाही तुम्हाला ?
जसा भाव तसा देव असतो. सामान्यतः मनुष्य पैसा, संपत्ती, भव्यता यांनी भुलतो किंवा त्याला त्याचे आकर्षण नक्कीच आहे. ही भूल अथवा आकर्षण देवामध्येही असेल असे त्याला मनापासून वाटते. (ही सुद्धा आणखी एक भूल). त्याकरिता तो एकतर अशा भव्य दिव्य देवस्थानांनी आकर्षित होतो तसेच देवाला वश करून घेण्यासाठी भल्या मोठ्या देणग्या देऊ करतो. आपले नाव प्रकट होणार असेल, आपणास तिथे विशेष privilage मिळणार असेल तर देणगी अजून मोठी. कांही लोक तर म्हणे देवाला धंद्यात पार्टनर करून घेतात व देवाच्या नफ्याचा वाटा देवाला. अरे, जिथे सारे कांही देवाने दिले आहे त्यात त्यालाच वाटणी ? धंद्यातला नफ्याचा वाटा देवाला देतात असे म्हणण्यापेक्षा देवाच्या नफ्याचा वाटा हे चतुर लोक "घेतात" हे सुध्दा नाही का संयुक्तिक होणार ?
साक्षात महालक्ष्मी ज्याचे पाय चेपते, त्याला माणूस पैशाची लालूच दाखवितो. मनुष्याने केलेली देवाची यापेक्षा मोठी टिंगल मला माहित नाही. नदीतील पाणी ओंजळीत घेऊन नदीत अर्घ्य देऊन "मी नदीत पाणी ओतले" म्हणणे किती हास्यास्पद आहे ?
तुका म्हणे कैसे | आंधळे हे जन | गेले विसरून | ख-या देवा ||
देवाला अर्पण नक्कीच करावे. पण त्याला काय कमी आहे ? त्याला आपल्याकडून काय अपेक्षित आहे ? ते त्याला अर्पण करावे, नाही का ? देवाला (त्यानेच निर्माण केलेले) पान, फुल, फळ किंवा पाणी देखील पुरेसे आहे. यापैकी कांहीही आपल्याजवळ नसले तरी "पाणी" आपल्या डोळ्यांमध्ये नाही का ? तेवढे सुध्दा त्याला दिले तरी तो खूष असतो. देवाला भक्तीची, भावाची भूक आहे. आपल्या पैशाने त्याचे पोट भरेल का ?
अजून खूप कांही लिहिण्यासारखे वाटते. मात्र हा माझा स्वतंत्र लेख नसून ती तुमच्या लेखावरील प्रतिक्रिया आहे, याचे भान मला ठेवायला हवे. म्हणून इथे थांबतो.
- गणेश देवळे, ३ जुलै, २०११
@ Ganesh sir:--- thanks u so much...tumachi pratikriya hi kharach ek nava marg dkhavate..
ReplyDelete@ABHISHEk --- mitra khup khup dhanyavad.....khup chhan vatal
ReplyDeleteज्ञानेश्वरीमध्ये एक खूप सुंदर ओवी आहे. ती आता आठवली म्हणून लिहितो -
ReplyDeleteस्वामिचिया मनोभावा | न चुकीजे हेची परमसेवा |
येर ते गा पांडवा | वाणिज्य करणे ||
भावार्थ : आपला स्वामी (म्हणजे देव) - त्याच्या मनामध्ये काय आहे ते ओळखून ते न चुकता करणे हीच त्याचे परमसेवा होते. याखेरीज आपण जे जे कांही करू ते केवळ "वाणिज्य" म्हणजे व्यापार, देवाण-घेवाण या सदरात मोडते.
आपण देवाची इच्छा काय असेल ते ओळखून त्याप्रमाणे बिनचूक वागावे, असा साधा अर्थ. पण 'देवाची इच्छा' काय आहे अथवा असू शकते ते पाहायला किती जण देवळात जातात ? जो तो आपापली इच्छाच पूर्ण व्हावी म्हणून देवाला सांकडे घालायला जातो. गाडी रुळावरून पहिल्यांदा घसरते ती इथे. भलत्या मार्गाला लागते ती त्यानंतर.
- गणेश देवळे, ४ जुलै, २०११
एका शब्दात सांगू सर,
ReplyDeleteसमर्थांचे शब्द .............. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा"
यातला गर्भितार्थ विसरत चाललाय आपला समाज .....आणि गाडी घसरून खूप वर्षे लोटली आहेत सर...
आणि ती भलत्या मार्गाला नाही लागलेली....कारण तो मार्ग भलता नाहीच आहे अशी समजून करून देण्यात आली आहे
आपली...ते सर्व नाही केल तर आपण देवाच्या डोळ्यात सलू अस वातावरण सोयीस्करपणे तयार करण्यात आलेल आहे.
आणि आता हि गाडी सुरळीत करणे म्हणजे धर्म निष्ठांना आणि श्रद्धांना उलथवून टाकून आव्हान निर्माण करणे होईल जे
धर्ममार्तंड व तथाकथित धर्मरक्षक यांच्या पोटावर पाय आणील...आणि कस आहे विठोबाला काहीही झाल तरी चालेल पण
पोटोबास आम्ही हात लावू देणार नाही....कारण विठोबा हातात असण हि त्यांच्या पोटोबाची गरज आहे
आम्हीच फक्त झक मारतो
ReplyDeleteसती सीतेवर संशय येतो, सोक्रेटीस येथे विष पितो
येशू सुळावर जातो आणि लोकमान्य गजाआड होतो
कुणी धडपडणारा मरतो, उरलेला टाळूवरचे लोणी खातो
कशासाठी ? कुणासाठी ?
समाज काय करतो ? समाज झक मारतो.
मेंढरे निदान एकाच्या मागे तरी चालतात
इथे प्रत्येक लांडगा, स्वतःचीच नवी वाट पाडतो.
कुणी आड आला तर भुवया उंचावून गुरगुरतो
पाठलाग करणारावर उलट हल्ला करतो
कशासाठी ? कुणासाठी ?
समाज काय करतो ? समाज झक मारतो.
जनतेला सोडाच, देवालाही लोक सोडत नाहीत
नागवा करतात, साधा लंगोटसुध्दा ठेवत नाहीत
पुजारी त्याचे काम करतो, देवासमोरचे गोळा करतो
आणि आम्ही डोळे मिटून दर्शन घेतो
कशासाठी ? कुणासाठी ?
समाज काय करतो ? समाज झक मारतो.
विवेकानंद व्हावेत, शिवाजी पुन्हा जन्माला यावेत
आम्ही नुसतेच म्हणतो, झुरतो, कुढतो
हातावर हात चोळत नपुसंकच राहतो
आदर्शांचे अवमूल्यन निष्कार्यतेने करतो
कशासाठी ? कुणासाठी ?
आम्ही काय करतो ? आम्हीच फक्त झक मारतो.
- गणेश देवळे, ४ जुलै, २०११
Chhan lihilas re mitra...Aavdla..
ReplyDeleteअप्रतिम..... खरे तर हा लेख किती सुंदर आहे हे सांगण्यासाठी मला शब्द सुचत नाहीत.
ReplyDeleteकदाचित राजगडाच्या त्या मंदिराची व्यथा इतक्या चांगल्या शब्दात सांगणे कोणालाच जमले नसते.
प्रशांत खूप खूप धन्यवाद.....
ReplyDeleteआज या भारतात देवालाही व्यथाच आहेत..हेच मोठ दुर्दैव...
अभिप्रयाबाद्दल खूप सारे आभार