Saturday, 9 July 2011

"कुणा एकट्याचीच ट्रेकिंगकथा"

स्थळ :- कॅफे paradise
तारीख, वार :- २ जुलै २०११, शनिवार
वेळ :- संध्याकाळी ६:३०
पात्रसंख्या :- ३
पात्रनावे :- अतुल तळाशीकर, नचिकेत कुलकर्णी, सारंग भोईरकर.

"मग उद्या जायचं ना कोरीगडला?"--सारंग
"अरे,उद्या घरी थांबायचं आहे.घरच्यांबरोबर बाहेर जावे लागेल"--अतुल
थोडा नाराज झालो मी,पण अतुलच म्हणण पटण्यासारख होत कारण गेल्याच विकेंडला राजगड केला होता आम्ही.
मग तोच प्रश्न मी नच्याला विचारला,म्हटलं हा नक्की येईल कारण तो राजगडला नव्हता. पण त्याने जे कारण दिल ते "आवरा" वर टाकण्याच्या लायकीच होत.
"माझ्या मावसबहिणीला नोकरी लागली आहे. सो, ती उद्या मला खायला घालणार आहे"--वदले कुलकर्णी
आणि तो "खायला घालणार आहे" असच म्हणाला बर का.!! नाहीतर तुम्हाला वाटेल मी अतिशयोक्ती करतोय.पार्टी देतीये, ट्रीट देतीये वगैरे काही नाही. "खायला घालणार आहे" संपला विषय. पण दोष त्याचा नाहीये .एकतर तो नारायण पेठेत राहतो.आणि दुसर अस कि तो नु.म.वि त शिकलाय.असो.
सलग दोन नकार (ट्रेकिंगचे) पचवून बाहेर पडलो. जिमला गेलो. तिथून संदीपला फोन केला. म्हटलं बघुयात हा तरी येऊ शकेन का? पण तो पुरंधरला जाणार होता.त्याच्या नकारानंतर मात्र उद्याच्या ट्रेकच्या कल्पनेची पूर्णपणे नसबंदी झाल्यासारख वाटल. पण तरीही कोरीगड मनातून जातच नव्हता आणि आता कुणालाही विचारण्यात रस उरला नव्हता.
जिम वरून घरी जातानाही गाडीवर तोच विचार आणि मग कस कुणास ठाऊक पण अचानक विचार आला मनात. कि एकट जायचं. नेहमी जातोच कि मित्रांबरोबर. उद्या एकटच जाऊयात.आणि तसही कोरीगड म्हणजे काय हरिश्चंद्र नाहीये कि कुणीतरी पाहिजेच बरोबर. सकाळी जाऊन संध्याकाळी परत.
त्या मनस्थितीतच घरी आलो. घरी फार काही बोललो नाही. लोणावळ्याला चाललोय एवढंच सांगितलं. नशीब "चौकशी समिती" बसली नाही. पण तरीही मासाहेबांनी कटकट केलीच. पण त्याचीही गरज आहेच कारण तिची चिडचिड झाल्याशिवाय माझा एकही ट्रेक पूर्ण होत नाही. (किंवा ती होऊ देत नाही.) एकूण एकच.
रविवारी सकाळी उठायलाच ७.३० वाजले. म्हटलं आता बोंबलतय जाण आपल. उशीर झाला. घाईघाईत आवरलं. आणि आहे तशीच sack घेऊन बाहेर पडलो. गाडीत पेट्रोल टाकल आणि वाकड च्या इथून NH-4 वर आलो. थोडा पाऊस भुरभुरत होता. फार गर्दी नव्हती. लोणावळा वगैरे भागाकड "विकेंड एन्जॉय" करायला जाणार पब्लिक दिसत होत. काही दुचाकीवर पण बरचस चारचाकीत. चारचाकीतल पब्लिक कस भुर्रकन निघून जात. पण दुचाकीवरच पब्लिक फार त्रास देत. म्हणजे गाडीवर एक मुलगा किंवा दोन मुलं असली तर आपल्याला कधीच त्रास होत नाही. पण जर एकाच गाडीवर भिन्नलिंगी माणस जर असतील, म्हणजे आपल्या वयाची तर मात्र लयी त्रास होतो. आणि असा त्रास परवा लयी झाला.एकतर "सुहाना सफर और ये मोसम हंसी" असा प्रकार, त्यात "मी यकटाच" आणि "ते दोघे". तिच्या मागे अजून एक माणूस बसवायचाय अशा समजुतीने ती बसलेली. दोघांच्या मधून केवळ मुंगी जाऊ शकेल एवढीच जागा. नाही, बसा हो. बसायला आमची काय हरकत असणारे? गाडी तुमची, पोरगी तुमची, खर्च तुमचा. फक्त आमचा प्रॉब्लेम असा आहे कि देवाने आम्हाला डोळे दिलेत आणि त्यांना असलं "भलत-सलतं" बघायची लयी सवय. आता हे "भलत" आहे कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण त्या तसल्या वातावरणात ते "सलतं" मात्र नक्की. असो.
पण जस तळेगाव सोडलं तशी रहदारी जरा विरळ होत गेली आणि मळवली आल्यावर डाव्या हाताला तुंग-तिकोना दिसले. एकदम फ्रेश वाटल. एक-दोन फोटो काढले. परत पुढे जायला लागलो. लोणावळ्यातून भुशी धरणाकडे वळलो. अजून १६ कि.मी. अंतर कापायच होत. १-२ कि.मी पुढे आलो, एक डोंगर ओलांडावा लागतो. छोटासा घाट आहे. त्यात शिरलो आणि ढगात चालणं काय असत याचा स्पष्ट अनुभव आला. मागे २० फुट आणि पुढे २० फुट एवढंच दिसत होत. बाकी संपूर्ण धुक. त्यामुळे सकाळी ९.३० वाजता गाडीचा दिवा लावावा लागला. तो घाट संपल्यावर एक फाटा लागतो. डावीकडचा रस्ता सहारा सिटीत जातो आणि उजवीकडच्या रस्त्याहून ४ कि.मी वर पेठ शहापूर. तिथेच एक केळेवाला उभा होता. त्याच्याकडून दोन केळी घेऊन खाल्ली. शहापूरला पोचेस्तोवर १०.१५ जाहले होते.

कोरीगडाचा आकार हा बराचसा कोयरी सारखा आहे. त्याचाच अपभ्रंश होवून हा कोरीगड झाला असावा आणि या कोयरीचा जो निमुळता भाग आहे त्याच्या पायथ्याला पेठ शहापूर आहे. चालायला सुरुवात केली आणि पहिल्यांदाच प्रत्यय आला तो उजव्या तटबंदीचा. जेव्हा आपण एखादा गड चढायला लागतो तेव्हा तटबंदी बर्याच वेळा उजव्या हाताला राहते. हे शिवदुर्गांच एक वैशिष्ट्य आहे. यामुळे होत असं,जर हल्ला झाला तर तटबंदीवरच्या पहारेकऱ्यांना एकेक माणूस नीट टिपता येतो. कोरीगड हा चढाईच्या दृष्टीने फारच किरकोळ आहे. आधी एक १० मिनिटांच जंगल आणि त्यानंतर ७०० पायर्या. थोड रमतगमत ५० मिनिटांत वर पोहोचलो.


महादरवाजाची बांधणी हि काहीशी गोमुखी थाटाची (शिवदुर्गांच आणखी एक वैशिष्ट्य). दरवाजाच्या बिजागर्यांचे होल्डर्स अजूनही दरवाज्याच्या आकाराची कल्पना देणारे आणि त्याच खालोखाल जमिनीपासून ५ फुटांवर अडसराची भोकं. या दोन गोष्टी आपल्याला अजूनही कुठल्याही गडावर बघायला मिळतील.


१६५७ मध्य हा गड महाराजांनी घेतल्याचे उल्लेख आहेत आणि आज जवळ जवळ ३५४ वर्षांनी सुद्धा त्या तशाच आहेत आणखी १००० वर्षे जगायला. दरवाज्याच्या समोरच असलेला या दरवाज्याचा संरक्षक बुरुज त्याच्यापासुनही ३० फुट उंचीवर आहे.


दरवाज्याच्या दर्शनी भागावर झेंडाकाठीपासून खाली ३ ते ४ फुटांवर, दोन्ही बाजूला एक नक्षी आहे, फुलांची हि नक्षी तुम्हाला जवळजवळ प्रत्येक गडाच्या महादारावाज्यावर दिसेल, बहुधा हिरोजी इटलकरांची ती favorite असावी.


आत गेल्यागेल्या लगेच एक सुंदर तलाव आहे.व्यवस्थित बांधून काढलेला. ज्याची भिंत हि थेट तटबंदीला जाऊन भिडते. आणि हो, महादरवाज्याचा थोड खाली १००-१५० पायर्या राहिलेल्या असतानाच पिण्याच्या पाण्याची सोय आहे. अतिशय निर्मळ पाणी. तलावाच्या काठीच महादेवच मंदिर आहे. छोटं आणि साधं. आत गेलो. अभिषेकपात्र रिकाम होत. तळ्यातून पाणी आणून ते भरलं. आरती करून बाहेर आलो. तटबंदीवर जाऊन उभा राहिलो आणि या गडाच आणखी एक वैशिष्ट्य नजरेत भरलं. ते म्हणजे उत्तर-दक्षिण पसरलेल्या या गडाची तटबंदी अजूनहि पूर्णपणे तशीच आहे.म्हणजे कोयरीच्या निमुळत्या बाजूपासून ते दुसर्या बाजूपर्यंत. आतल्या बाजूने मोजली तर काही ठिकाणी ती ५ ते ६ फुट आहे तर बाहेरील बाजूने डोंगराच्या मुख्य कातळापासून तिची उंची १८ ते २० फुट आहे.



महादरवाज्याचा एक बुरुज सोडला तर आणखी दोन बुरुज दिसतात..एक दक्षिणेला आणि एक उत्तरेला ( शहापूर जवळचा ). तटबंदीवर दर १०० फुटांवर बंदुकीच्या जागा आहेत..या जागांमध्ये काही ठिकाणी तटबंदीतच एक आडोसा तयार करण्यात आला आहे. आणि त्या अडोश्याच्या आत एक माणूस बसू शकेल एवढी जागा आणि एक outlet आहे. बहुधा याचा उपयोग तटबंदीवरच्या पहारेकर्यांकडून शौचकुपासारखा होत असावा. या अशा दोन-तीन जागा आहेत. "संडास" या गोष्टीचाही हिरोजींनी किती बारीक विचार केला होता आणि आज स्वातंत्र्या नंतर ६० वर्षे ओलांडली तरी आम्ही "हागणदारी मुक्त " गावाच्या योजना राबवीत असतो.


उत्तरेचा बुरुज हा आकाराने छोटा आणि त्याच्या खाली लगेच ताशीव कडा. या बुरुजाच्या मागेच १००-१५० मीटरवर डाव्या तटबंदीपासून आत एक खंदक आहे, ज्याच्या आत पाण्याची टाकी आणि छोट्या गुहा आहेत. तसं पाहायला गेल तर गडाच दक्षिणोत्तर अंतर हे २.५-३ कि.मी च्या आसपास, जे इतर गडांच्या तुलनेत फारच लहान. पण तरीही या एवढ्याश्या गडावर पाण्याची फारच मुबलक सोय आहे. पाण्याच महत्व राजांनी किती ओळखल होत हे यावरूनच दिसत. बुरुजावर गेलो तिथे आधीच काही मंडळी होती. त्या सगळ्यांना एकत्र करून एक मस्त घोषणा दिली आणि दक्षिणेच्या बुरुजाकडे निघालो.



जाताना तलाव ओलांडावा लागतो. त्याच्या पलीकडे महादेवच मंदिर आणि त्याच्याच शेजारी थोड वरच्या बाजूला गणपती आणि विष्णूच मंदिर. मी आत जाणार तेवढ्यात बाजूला काहीतरी चमकल. एक रामाचा फोटो होता. व्यवस्थित फ्रेम केलेला. राम, सीता, लक्ष्मण आणि मारुती चौघ आपले निवांत बसले होते. बाजूला दगड आणि धोंडे.


मला त्या फोटोच तिथल प्रयोजनच कळेना. पण म्हटलं जाऊ दे असेल काहीतरी. बूट काढून आत जाणार पण राम काही जाऊ देईना. सरळ खाली गेलो. फोटो उचलला आणि आत घेऊन आलो.आत आधी एक शिवलिंग आहे. त्याच्या मागे विष्णू, गणपती यांच्या दगडी मुर्त्या आणि त्यांच्या शेजारी साईबाबांचा एक फोटो. त्याच्याच शेजारी थोड adjust करून रामभाऊंना बसवलं. अयोध्येत नाही तर नाही निदान इथे तरी रामाला मंदिर देऊ शकलो याच समाधान. गणपतीची आरती केली. अभिषेकपात्र भरलं पाण्याने आणि बाहेर पडलो.


दक्षिणेकडच्या बुरुजाचा विस्तार हा बराच मोठा आहे. या बुरुजाकडे जाताना वाटेत दोन भग्नावशेष दिसले. आकारावरून तरी दारू कोठार आणि किल्लेदाराच्या वाड्याचे वाटतात. या बुरूजाजवळच कोराई माता मंदिर आहे. अगदी प्रशस्त. सभामंडप असलेल. कोराईदेवीची मुर्तीही उभट आणि प्रसन्नवदन असलेली. दर्शन घेऊन आरती केली. मंदिराच्या बाहेरच चौथार्यावर एक सुंदर दीपमाळ आहे.



मंदिराच्या मागे डावीकडे तटबंदीवर एक ९-१० फुट लांब तोफ आहे. पूर्वेकडून तोंड करून राहिलेली. मी तिथे गेलो तेव्हा एक मुलगा त्या तोफेवर आपल्या बापाची जहागीर आहे अशा पद्धतीने झोपून फोटो काढून घेत होता. पराक्रमाच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात हेच खर.असो.


कोराई मंदिराच्या मागे उजवीकडे तटबंदीत काही पायर्या आहेट ज्या थेट दक्षिणेच्या दरवाजात गेलेल्या. हा दरवाजा आंबवणे गावाकडे उघडतो. या दरवाज्याच्या गडाकडील भागात दर्शनी माथ्यावर एक चिन्ह कोरलंय. हे असच चिन्ह बाकीच्या गडांवरहि दिसत.


या दरवाजातून बघितलं तर दक्षिणेच्या बुरुजाचे आणि तटबंदीचे तीन थर एकाखालोखाल दिसतात. हि बांधणी केलीच कशी असेल याच गोष्टीच नवल वाटत. गडाच्या सीमा किती सुरक्षित असाव्यात याच हे एक उत्तम उदाहरण आहे.


या दरवाजाचा संरक्षक बुरुज म्हणजेच तो दक्षिणेचा बुरुज. दरवाज्यातून त्या बुरुजावर जायला एकतर कोराई मंदिराला वळसा घालून जाव लागत किंवा मग एक छोटा rock patch पार करून तटबंदीच्या बाजूने जाव लागत. बुरुजापासून मागे १००-२०० मीटर अंतरावर आणखी एक तोफ आहे. तिचीही लांबी ९-१० फुट असेल. तीच नाव लक्ष्मी तोफ.


या दक्षिणेकडच्या बुरुजाला वर जायला पायर्या आहेत. त्या पायर्यांच्या थोडंच मागे आणखी एक तोफ जमिनीवर पडलेली दिसली. लांबी बाकीच्या दोन तोफांची आहे तितकीच.



या बुरुजावरूनच खाली सहारा सिटी दिसते. उद्योगपतींचे आणि सत्ताधार्यांचे हात निसर्गाभोवती किती घट्ट आवळले आहेत याची कल्पना येते. या बुरुजाच्या मागे जी लक्ष्मी तोफ आहे तिच्या जवळ एक चौकोनी खोलगट बांधकाम आहे. कदाचित तो घोड्यांचा पाणवठा असावा.


कोराईमाता मंदिर आणि बुरुज यांच्यामध्ये एक निसर्गनिर्मित खंदक तयार झाला आहे. तो थेट दरवाजात जाऊन पोहोचतो. त्याच्यामुळे दरवाज्याच्या मागे एक छोटासा पण सुंदर आणि सुबक धबधबा तयार झाला आहे. निसर्गाने सह्याद्रीला सुंदरतेच लेण नेसवताना कुठेही हात आखडता घेतला नाहीये याच प्रत्यंतर पावलोपावली येत राहत.


आता जवळजवळ सगळा गड फिरून झाला होता. तसाच चालत महादरावाज्यात आलो. सहज म्हणून घड्याळ बघितलं तर ३.३० वाजले होते. तिथेच बाजूला एक ग्रुप काहीतरी खात बसला होता. ते पाहिल्यावर लक्षात आल कि अरेच्च्या आपण काहीच खाल्लेलं नाहीये, म्हणजे आपल्याकडे खायला काहीच नाहीये आणि हा पहिला ट्रेक असेल जिथे मी पाण्याची बाटलीही विसरलो होतो. पण गड पाहताना आणि त्याचा अभ्यास करता याची कशाचीच आठवण राहिली नव्हती. एकदा तटबंदीवर चढून परत गड दिसेल तितका पाहून घेतला. महादरवाज्यातून बाहेर पडून गडाला आणि महाद्वाराला मुजरा केला आणि उतरायला लागलो. २० मिनिटात खाली आलो. येताना वाटेत एक "धनाजी जाधव" नामक ठाण्याला राहणाऱ्या मित्राची ओळख झाली. त्याच्या ऐतिहासिक नावामुळे तो चांगलाच लक्षात राहिला.गाडीपाशी आलो. "धनाजीरावांचा आणि कोरीगडाचा" निरोप घेतला आणि पुण्याच्या वाटेला लागलो....

पोटात भूक होती पण एक छोटीशी गोष्ट केल्यामुळे जो आनंद आणि आत्मविश्वास मिळाला होता त्यापुढे तीच काहीच वाटत नव्हत. माणसांच्या जंगलात स्वतःच माणूसपण हरवून जगणाऱ्या आपल्यासारख्यांनी कधीतरी माणूस व्हायला खर्याखुर्या जंगलात जायला हव. स्वतःचेच काही नवीन पैलू शोधायला आणि मुख्य म्हणजे स्वतःची कंपनी एन्जॉय करायला. मी तरी केली ती !! तुम्ही कधी करताय? -:)


--
-- आपला,
|| श्रीशिवछत्रपती चरणी तत्पर, सारंग भोईरकर ||

17 comments:

  1. प्रिय सारंग,

    तुम्ही आम्हास घरबसल्या कोरीगड दाखविला. जणू एक Live Documentory. मात्र मी तुम्हाला आताच "धन्यवाद" म्हणणार नाही. मला एखाद्या गडाची प्रत्यक्ष 'वारी' घडवून आणलीत तरच म्हणीन. खरे तर मी या गडाचे नावही प्रथमच ऐकले. माझे इतिहासाबद्दलचे अज्ञान खूप प्रगाढ आहे.

    कांहीसे मजेशीर, कांहीसे गंभीर असे एक कवण बसल्या बसल्या मनात आले -

    ध्येयवेड्यास न बांधू शके
    आप्त-सोबत्यांचा गुंता
    यायचे तर या जरूर, अथवा
    हा चाललोच मी आता

    कुणासमवेत "चिकट सोबती"
    इष्ट गाव त्यांचे वेगळे
    बहाद्दर आमचा एकला जाई
    वेडच त्याचे आगळे !

    स्वर्ग वेगळे प्रत्येकाचे
    जरी एकाच सह्याद्रीवरती
    एक सोकावला 'चिक्की'ला
    एकास प्यारी दुर्गांची माती

    चल रे गड्या तू एकला
    थबकू नको साथीसाठी
    साद तुजला सदैव देतसे
    शिवरायांची संपदा मोठी

    - गणेश देवळे, ९ जुलै, २०११

    ReplyDelete
  2. धन्यवाद सर,
    तुम्ही जितकी तारीफ केली आहे त्या योग्यतेचा मी नक्कीच नाही पण एकट चालण्याची मजा काही औरच असते..
    खूप नवं काही कळत..गोष्टी उलगडतात....स्वतःच्याच मनाची आणि विचारांची नव्याने ओळख होते...
    गर्दीत राहून ते अनुभवता येत नाही.....
    आणि हो, तुम्हाला गड दाखवल्याशिवाय मी हि स्वस्थ बसणार नाही हे वचन....
    अभिप्रायाबद्दल खूप सारे आभार...!!!

    ReplyDelete
  3. प्रिय सारंग,

    खोटी तारीफ करण्याचा प्रश्नच येत नाही - तशी कुणाची का म्हणून उगीचच करावी ? कुणी आपली तारीफ केली तर ती फार मनावर घेऊ नये, हे देखील खरे. नाही तर "ससा आणि कासव" या गोष्टीमधल्या सशासारखी आपली गत होते. दुसरे असे की, तारीफ जर केलीच असेल तर ती "सारंग भोईरकर" या व्यक्तीची नसून त्याच्यामध्ये प्रसंगाने दिसून आलेल्या एका वेगळ्या पैलूची आहे.

    हिमनगाचे टोक म्हणजे संपूर्ण हिमनग नव्हे - ते फक्त एक दर्शक आहे. नकाशा म्हणजे देश नव्हे. मात्र नकाशा आणि त्यातील प्रमाणावरून (scale) अवाढव्य देशाच्या आकाराची कल्पना येऊ शकते. तद्वत, कोणत्याही व्यक्तीमधला दृश्य सद्गुण - भले तो 'दिसण्यास' छोटा असेल - म्हणजे संपूर्ण व्यक्ती नव्हे. त्या व्यक्तीमधल्या अप्रकट सद्गुणांचा, त्या 'हिमनगाचा', तो पृष्ठभागावर दिसणारा एक 'छोटा' अंश असतो. अशी दृष्टी माझ्यामध्ये निर्माण व्हावी म्हणून मी "दुर्बीण" घेऊन पाहण्याचा प्रयत्न करतो. कदाचित म्हणून दूरची वस्तू अधिक जवळ आणि अधिक स्पष्ट दिसते. स्वतःमधल्या दोषांचे "सूक्ष्मदर्शक" घेऊन परीक्षण करणे मात्र मला अजून जमत नाही. असो.

    "एकट चालण्याची मजा काही औरच असते.. खूप नवं काही कळत..गोष्टी उलगडतात....स्वतःच्याच मनाची आणि विचारांची नव्याने ओळख होते... गर्दीत राहून ते अनुभवता येत नाही....." याची खरीखुरी ओळख पटलेले, आणि त्याप्रमाणे प्रसंगी एकटेच जाणारे किती जण असतील ? हल्ली तरी निश्चितच मोजके. एखाद्या गोष्टीचे "मोल" समजल्याखेरीज मनुष्य ती गोष्ट स्वीकारण्यास, त्यासाठी धडपडण्यास तयार होत नसतो. कुणाला कशाचे मोल वाटते हा त्या त्या व्यक्तीच्या विचारांचा, संस्कारांचा विषय असतो.

    असो. आता अजून bore करायला नको...

    - गणेश देवळे, १० जुलै, २०११

    ReplyDelete
  4. khupach mast ahe korigad cha plan ugach cancel kela amhi last time,ata nakkich jayala pahije,
    janana prabodhini madhe ase anubhav ghyayala shikawale pan jast jamal nahi good try asa prayatn karayala pahije

    ReplyDelete
  5. धन्यवाद सर,
    खर तर बोअर वगैरे तुम्ही करत नाहीत कधीच......हो हे मात्र खर कि दुर्बीण जी आपल्या स्वतःच्या अंतरंगात डोकावू शकेल
    तिची गरज फारच असते..किंवा या सध्याच्या काळात खूपच आहे..कारण संस्कार, परंपरा या गोष्टी हल्ली "boaring stuff "
    याच सदरात मोडतात..संस्कार प्रत्येकावर होतात पण ते खोट्या आधुनकतेपायी दाबून टाकले जातात आणि मग उरतो फक्त एक
    निर्विकार हाडा-मासाचा देह...जो पोटा-पाण्याच्या उद्योगापलीकडे कशातच धन्यता मानत नाही.....असो...धन्यवाद सर..
    तुमच्या अशा विचारांमुळे मी आणखी विचारांना आणि लिहायला उद्युक्त होतो...आणि सर तुमच्या प्रतिक्रिया या माझ्यासाठी कधीच boaring
    नसतात..

    ReplyDelete
  6. @ Mrunmayi :---- thanks a lot.... jaun yach ekda KORIGAD la

    ReplyDelete
  7. या लेखावर ज्यांच्यावर मी शिंतोडे उडवले आहेत त्या दस्तुरखुद्द श्री.नचिकेत कुलकर्णी यांची प्रतिक्रिया आली आहे...ती येणेप्रमाणे...


    "हमारे गाव में एक कहावत है 'जब लोग तुम्हारे खिलाफ बोलने लगे तो समझो की तरक्की कर राहे हो !' " ... jokes apart पण आता खरच चुटपूट लागून राहिली आहे की बहिणीकडून खाणं कधीपण उकळता आला असतं पण त्या वेळी गडावर यायला पाहिजे होतं ...

    ReplyDelete
  8. सारंग पुन्हा एकदा फार सुंदर लेख लिहिला आहेस......
    तुझ्या लिखाणाच्या शैली बद्दल मी काय बोलावे.. केवळ अप्रतिम.....
    या लेखामधून मला एक गोष्ट जाणवली..... कि तुझा गडा बद्दलचा अभ्यास....
    ज्या प्रमाणे तुला शिवाजी महाराज, इतिहास या बदल संपूर्ण माहिती आहे त्याच प्रमाणे तुला त्या काळातील बांधकाम शैली, लोकांची राहण्यची पद्धत, गडावरच्या ज्या गोष्टी आज भग्न झालेल्या आहेत त्या बद्दल पण तू इत्यंभूत अशी माहिती पुरवली आहे....
    त्या बद्दल तुझे कौतुक करावे तेवढे कमी आहे.....
    आणि त्यासाठी मी तुझा आभारी आहे...
    मला एक आनंद आहे कि तू साचेबंद लिखणात अडकला नाहीस.... तू अनेक वेगळ्या वेगळ्या विषयासाठी लिखाण करत आहेस....
    आज आणखी एक गोष्ट सिद्ध झाली कि तुझ्या लेखनाला अनेक पैलू आहेत... अनेक विविध प्रकारचे साहित्य प्रकार हाताळू शकतोस....
    जर मी चुकत नसेल तर हा तुझा लेख प्रवासवर्णन या साहित्य प्रकारत मोडेल.....
    असेच लिखाण करत जा.... तुझ्यात ते गुण आहेत एक महान लेखक होण्याचे असे मी तुला मागे म्हणालो होतो आणि हा लेख त्याचे एक उदाहरण आहे......

    साहित्याच्या क्षितिजावर एक नवीन ता-याचा उदय झाला आहे... आणि माझी खात्री आहे कि तो एका ध्रुव ता-या सारखा साहित्याच्या क्षेत्रात आपले अढळपद निर्माण करेल.....

    ReplyDelete
  9. धन्यवाद हर्षल,
    एका वाक्यावर एक छोटीशी सुधारणा सुचवू इच्छितो. ती म्हणजे, महाराज आणि इतिहास याबाबत
    मला सामौर्ण माहिती खरच नाहीये. मी ती साठवण्याचा प्रयत्न नक्की करतोय...आणि ते होईल पूर्ण नक्की...
    आणि अरे मी साहित्यिक वगैरे नाही किंवा होऊ शकत नाही कारण ती प्रतिभा माझ्यात नाही...हां, मी लिहितो हे
    मात्र खर...ते हि तोपर्यंत जोवर कुणीही ते वाचून बोअर होणार नाही तोवरच... एवढ मात्र खर कि वेगळ्या वेगळ्या विषयांवर
    लिहित राहायचं हे मी ठरवलंय...बघू कितपत जमत ते....
    अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार

    ReplyDelete
  10. धन्यवाद सारंग....
    तू असे लिहित राहा आणि रसिकांना चांगल्या वाचण्याचा अनुभव येऊ देत हीच माझी मनापासून इच्छा आहे.....
    तुझ्या लेखणीतून या पेक्षाही सुंदर लेखांची निर्मिती होत राहो हीच प्रभू चरणी प्रार्थना.....

    आणि एक गोष्ट महत्वाची तुझे लेख बिलकुल सुद्धा bore करत नाहीत (आणि कधी करणार पण नाहीत...) त्यामुळे हि समज (गैरसमज) मनातून काढून टाक....

    ReplyDelete
  11. धन्यवाद हर्षल,
    या अशाच प्रोत्साहनामुळे खूप उभारी येते..कष्टच चीज झाल्याच वाटत...
    खूप सारे आभार

    ReplyDelete
  12. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  13. सारंग मित्रा लेख खरच खूप छान जमलाय, खरच तुला नकार दिला ते एका द्रुष्टिने बरेच झाले, नाहीतर हा लेख आम्हाला वाचायला मिळाला नसता. तु खरच या गडाचे वर्णेन छान केले आहे, आता तर मला पण असे वाट्ते,की एकदा यावेच बघुन...
    (आता कंसातील वाक्य, तुला नाही म्हणालो व त्याच रात्री ११ वाजता मला मित्राचा फोन आला की आपला पुरंधर चा ट्रेक रद्द झाला.)
    पण खरच खूप छान वाटले की कोनीही नसताना तु एकटा देखील ट्रेक करु शकतोस, पुढच्या वेळेस नक्की सोबत असेन......

    बाकी अजुन काय नेहमी प्रमाणे अजुन लिहीत जा व आमच्या बुद्धिप्रमाणे आम्ही प्रतिक्रिया देऊ .....

    ReplyDelete
  14. संदीप मित्रा,
    खूप सारे धन्यवाद !!!
    खर तर तू नाही म्हणालास तेव्हा मी खरच खूप खट्टू झालो होतो कि आता कुणीच नाही म्हणून
    पण त्यातूनच हि कल्पना जन्माला आली.
    पण आपण नक्की जाऊयात या किंवा पुढच्या महिन्यात ट्रेकला.
    अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद !!!

    ReplyDelete
  15. Awesome comment...khup chan...keep it up...

    ReplyDelete