तुंग उर्फ कठीणगड....पुण्याच्या वायव्येस सुमारे ७५ कि.मीवर असलेला एक देखणा पण नावाशी जरा विसंगत असलेला गड.
नावाशी विसंगत कारण हा चढाई करायला अजिबात अवघड नाही. हो पण भासवतो मात्र तसा.
तुंग खरतर तीकोन्याप्रमाणेच घाटरक्षक. स्वराज्याच्या अनेक दुर्गद्वयींपैकी एक. याचा सुळका किंवा सुळक्यासारखा आकार असलेला माथा अतिशय आकर्षक. म्हणजे हे त्यांच्यासाठी नाहीये ज्यांना, संदीप खरेच्या भाषेत सांगायचं झाल तर, "डोंगर बघता उंची नाही खोली आठवते".
खर सांगू तर हे गड, त्यांचे सुळके, ताशीव कडे, माच्या, बुरुज, तटबंदया, दरवाजे, भक्कम पायर्र्या, जोती हे खरे पुरुषार्थाचे प्रतिक वाटतात.
खुणावत असतात ते आपल्याला. म्हणत असतात कि "या रे पोरांनो, मनसोक्त बागडा माझ्या अंगाखांद्यावर. अरे तुमच्या पूर्वजांनी याच माझ्या छातीवर आणि खांद्यावर उभे राहून स्वराज्य उभ केलं.मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहात." हे आणि अस बरच काही. असो थोडासा भरकटलो मी.!!
शनिवार २० ऑगस्टला सकाळी ७.३० ला निघालो. मी, अतुल तळाशीकर, नचिकेत कुलकर्णी आणि मंगेश मगर असे चौघे होतो. पाऊस नव्हता. बरंचस आभाळ साफ होत.
मधून मधून सूर्य डोकावून जात होता. तुंगचा रस्ता हाही तीकोन्यासारखाच. पुणे -- चांदणी चौक -- पौड -- हाडशी -- कोळवण -- जवण -- शिळीम -- तुंगवाडी.
आधी गाडीत आणि मग पोटात इंधन टाकून पौडवरून उजवीकडे वळालो. आणि हाडशी, कोळवण गावे पार करीत जवण फाट्याला आलो. इथे एक खूप छान दृश्य दिसतं.
जवण फाट्यापासून आपण उजव्या हाताला पाहिलं तर भला मोठा तिकोना त्याच्या डोंगरधारांसकट पसरलेला दिसतो. आणि डाव्या हाताला दूरवर तुंगचा सुळका खुणावत असतो.
इथून डाव्या हाताला वळालो आणि तीकोन्याला पाठीशी ठेवून आम्ही तुंगकडे जायला लागलो. जवणफाट्यापासून तुंग हा बरोबर २७ कि.मी राहतो.
इथून पुढचा हा २७ कि.मीचा रस्ता भारतातील खेडी, त्यांतील रस्ते आणि त्यांचा सामान्यांना होणारा त्रास या तिन्ही गोष्टींवर चर्चा करण्यासाठी भरपूर मुद्दे पुरवणारा होता.
इतका कुरूप रस्ता मी पाहिला नव्हता. आजूबाजूला जर निसर्ग सौंदर्य नसत तर मात्र आणखी बाजार उठला असता. रस्ता मधेच फाटलेला होता, खड्डे तर असंख्य. त्याला पक्का म्हणावे तर बरीच माती आणि कच्चा म्हणावे तर मधेच डांबर दिसायचे.पण हे असलं तरी निसर्गाने नेसलेली हिरवाई मात्र यात मोहून टाकते. त्यातच मध्ये मध्ये होणारं पवना धरणाच दर्शन हे हि सुखद.
लांबून पाहिलं तर तुंग हा एका भिंतीसारखा दिसतो.पण हि भिंत कशी तर एकावरएक ४ पायर्या असलेली.
याची सर्वात डावीकडची पायरी म्हणजे त्याचा दक्षिणेकडचा बुरुज आणि सर्वात शेवटची पायरी म्हणजे तो उत्तरेकडचा माथा किंवा सुळका. पण या पायर्यांचे एकमेकातल अंतर मात्र बरेच मोठे. मजल दरमजल करीत तुंगवाडीत पोहोचलो.
हे गाव फार मोठ नाही. म्हणजे अजिबातच मोठ नाही.गावाच्या आणि गडाच्या मधून एक रस्ता जातो जो उत्तरेकडे थेट पवना धरणात उतरतो.
तुंग हा दक्षिणोत्तर पसरलेला गड. याचा मुख्य दरवाजा हा उत्तरेकडे तोंड करून असलेला. या गडाच एक वैशिष्ट्य म्हणा किंवा एक सांगण्यासारखी बाब म्हणजे या दरवाज्याचे बुरुज आपल्याला पायाथ्यापासुनही दिसतात.
गडाच्या पायथ्याशीच एक मारूतीच मंदिर आहे. त्याच्या शेजारूनच गडाची पायवाट चालू होते. हि संपूर्ण वाट गड किंवा तटबंदी डाव्या हाताला ठेऊन वर जाते जे शिवदुर्गांच एक वैशिष्ट्य.
पायवाटेवर सुरुवातीलाच काही पायर्या आहेत. आत्ताच बांधलेल्या आहेत त्या. त्या संपल्या कि शिवकालीन काही पायर्या मध्ये मध्ये लागतात. वाट अवघड नाही पण मध्ये मध्ये पायर्या अरुंद आहेत. पाण्याचे छोटे ओहोळ खाली येत होते म्हणून जपून चालव लागत होत. एक दोन खेकडेहि दिसले. थोड वर चढून आल कि डाव्या हाताला जी पायर्यांची भिंत आहे तिथे एक भिंतीतच एक कोनाडा आहे त्यात एक मारुती आहे. त्याच नाव-गाव काही माहित नाही पण त्याच वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या कंबरेत एक चाकू किंवा खंजीर आहे. मी तरी आजवर गदा सोडून कुठलंच शस्त्र मारुतीकडे पाहिलेले नाही.
इथूनच आपण उजव्या हाताला पाहिलं कि विस्तीर्ण पसरलेलं पवना खोर आणि पवना धरणाच अतिशय विहंगम असं दर्शन होत. चढाईचा पूर्ण थकवा इथेच निघून जातो. या गडाची आणखी एक सांगण्यासारखी बाब म्हणजे याच्या डोंगरावर आणि डोंगरउतारावर पसरलेली रानकेळींची बने. "बने" हा शब्द मी मुद्दाम वापरला कारण त्यावरून तुम्ही कल्पना करू शकाल कि त्यांची मोजदाद ठेवण शक्यच नाही. आत्ता त्या सर्व झाडांना अगदी छोटी छोटी केळी लागली होती.आणि "टेबल लाम्प" सारख दिसणार केळफूल मात्र प्रत्येक झाडावर दिसत होत.
माथ्याजवळ आल्यावर मात्र आपण एक डावीकडे वळण घेतो आणि तटबंदी उजवी ठेऊन थोड चालल्यावर आपण पहिल्या दरवाज्यात येतो. पायथ्यापासून हे अंतर कापायला ४५ मिनिटे खूप होतात. इथे आम्ही पैसा किड्याची जोडी पहिली. दरवाजा फार तर १५ फुटी असावा. अडसराची भोके आणि बिजागार्यांचे होल्डर्स अजूनही तसेच.
इथून थोड चढून गेल्यावर दोन बुरुज लागतात. मुख्य दरवाज्याचे संरक्षक बुरुज आहेत ते. उंची २५-३० फुट आहे. इथून डाव वळण घेऊन आपण दरवाज्यात येतो. हि बांधणी गोमुखी आहे. दरवाज्याच्या समोर जो बुरुजाचा भाग येतो त्यावर त्या बुरुजाचा संरक्षक मारुती आहे. अजूनही त्याचा शेंदूर नीट आहे. या दरवाज्याला लागूनच दोन्ही बाजूला पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. या अशा देवड्या बर्याच कमी ठिकाणी पाहायला मिळतात.
आणखी ३-४ पायर्या चढून गेलो कि आपण एका पठारावर येतो. इथून थोड्पुढे चालत गेल कि उत्तरेचा छोटा बुरुज लागतो. हा बुरुज म्हणजे मघाशी मी जी पायर्या असलेली भिंत म्हणालो त्याची सर्वात खालची पायरी आहे. आणि आपण ज्या पठारावर येतो ती दुसरी पायरी ठरते.
या बुरुजाच्या बरोबर विरुद्ध बाजूला म्हणजे दक्षिणेकडे तुंगचा तो सुळका किंवा माथा आहे. त्याच्या वाटेवर प्रथम एक कातळ कोरीव पाण्याच टाक आहे आणि त्या टाक्याच्या काठीच अतिशय जीर्ण असं गणपतीच मंदिर. बाप्पांची मूर्ती बैठ्या स्वरुपाची आहे.
याच्या शेजारून माथ्याकडे जायला लागलो कि थोड चढून आपण परत एका पठारावर येतो. हि त्या भिंतीची तिसरी पायरी म्हणजे हे पठार. इथे एका विशिष्ट प्रकारची झुडूप दिसली. त्यांच्या पानांमुळे ते एकसंध वाटतात.
इथून आपण एका चिंचोळ्या वाटेने ५ मिनिटात गडाच्या सर्वोच्च माथ्यावर येऊन पोहोचतो. हीच ती चौथी पायरी. याचा विस्तार फार मोठा नाही.
याच्या दक्षिणेच्या टोकावर कसलातरी शेंदरी देव आहे. कदाचित म्हसोबा किंवा भैरोबा असेल आणि उत्तरेकडे झेंडाकाठी. इथे आम्ही एक मस्त घोषणा दिली.
इथून समोरच काहीसा आग्नेयेकडे पण बराचसा दक्षिणेकडे वसलेला तिकोना दिसतो. तसेच पश्चिमेला लोहगड आणि ईशान्येस विसापूर हि दुर्गजोडी दिसते.इथून जर आपण पूर्वेला नीट पाहिलं तर दोन डोंगरांमधून काहीस अस्पष्ट असं मुळशी धरणाच पाणी दिसत. इथून आपण नीट पाहिलं तर उत्तर सोडून बाकी तीनही दिशांना पवनेच पाणी दिसत. आणि त्याचबरोबर जागोजागी निसर्गाची कूस फाडून त्याच्यात धनदांड्ग्यांनी आणि राजकारण्यांनी उभरलेले आपले बंगलेही दिसतात.
आता सगळा गड पाहून झाला होता. गणपतीच्या देवळापाशी येऊन आरती केली. पठारावर बसून थोड खाऊन घेतलं आणि उतरायला लागलो. येताना वाटेत तो खंजीर मारुती पुन्हा दिसतो. शनिवार होता. खड्या आवाजात चौघांनी मारुतिस्तोत्र म्हटलं आणि पायथ्याला आलो.
गाड्या काढल्या आणि तुंगचा निरोप घेतला. तसा छोटासाच पण स्वराज्याच्या अगदी मोक्याच्या जागी वसलेला हा गड मनातही एक मस्त घर करून बसतो आणि सर्वात महत्वाच मनात राहत ते त्याच्यावरून दिसणार पवनेच पाणी.
--
-- आपला,
|| श्रीशिवछत्रपती चरणी तत्पर, सारंग भोईरकर ||
ek number sarang
ReplyDeleteफारच सुंदर झाला आहे लेख......
ReplyDeleteतू केलेले निसर्गाचे वर्णन फारच मनमोहक आहे. ....
तू केलेल्या वर्णनामुळे एकवार तरी या गडाल भेट द्यावाशी वाटते आहे.....
त्याचप्रमाणे आणखी एका गोष्टीचे या ठिकाणी कौतुक करावेसे वाटते कि तू केलेला photos चा वापर...
Photos मुळे आपण मांडत असलेला मुद्दा जास्त चांगल्या प्रकारे मांडता येतो असे माझे मत आहे...
All the snaps in this article are beautiful as well as nicely taken and used in article.
Keep up the good work.....
Looking forward for the next one......
Thanks Atul and Harshal....thanks a lot
ReplyDelete